Shrigonda Alka Anabhule Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Alka Anabhule: अलका अनभुले यांची उपनगराध्यक्षपदी निवड, भाजपच्या अमीन शेख व महावीर पटवा नामनिर्देशित सदस्य

शिवसेना नगरसेवकांमध्ये गोंधळ, नामनिर्देशित सदस्यपदी राजकीय विवाद; आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला विरोधाचा प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षपदी अलका अनभुले यांची निवड झाली, तर नामनिर्देशित सदस्यपदी भाजपचे अमीन शेख व महावीर पटवा यांची निवड करण्यात आली. दरम्यान, सदस्य पदाच्या निवडीत शिवसेनेच्या एका सदस्याची निवड होणे शक्य असताना ती न झाल्याने शिवसेना नगरसेवकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह तेरा जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. उपनगराध्यक्षपदी अलका अनभुले यांची निवड जवळपास निश्चित करण्यात आली होती. आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांच्या अध्यक्षेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेना शिंदे पक्षाकडून अनिता औटी यांचा उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज, तर भाजपकडून अलका अनभुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात भाजपच्या अनभुले यांना 13 मते, तर शिवसेनेच्या औटी यांना 9 मते मिळाली.

नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. नियमाप्रमाणे भाजपचा एक आणि शिवसेनेचा एक स्वीकृत नगरसेवक होईल, असे अपेक्षित होते. स्वीकृत नगरसेवकपदी भाजपकडून आमीन शेख आणि महावीर पटवा यांची निवड झाली. शिवसेनेकडून कुणाचेच नाव न आल्याने त्या जागेवर नगराध्यक्षांनी अधिकार वापरत पटवा यांची निवड केली. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी नामनिर्देशित सदस्यपदी मनोहर पोटे यांची निवड करावी अशा स्वरूपाचे पत्र प्रांताधिकारी कार्यालयात आपण सादर केले असल्याचे नगरसेवक अख्तर शेख यांनी सांगितले. त्याबाबतचा पुरावा माझ्याकडे आहे. सादर केले होते. मात्र ते पत्र पुढे नगरपालिका कार्यालयाकडे गेले नाही. मनोहर पोटे यांची निवड का झाली नाही याबाबतचा कुठलाही कागद नगराध्यक्षांनी दाखविला नाही. ही निवड प्रक्रिया राजकीय दबावाखाली झाली असल्याचा आरोप अख्तर शेख यांनी केला. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक प्रांताधिकारी चिंचकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, ते कार्यालयात हजर नव्हते. चिंचकर यांचा मोबाईल ही बंद होता.

प्रांतांचा नो रिस्पॉन्स

दरम्यान, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडून माहिती घेण्यासाठी तालुक्यातील माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुणाचेच फोन उचलले नाहीत.

सोमवारी झालेल्या निवडीवर होणारे राजकीय हस्तक्षेपाचे आरोप हास्यास्पद आहेत. गटनेत्याची शिफारस नसल्यामुळे शिवसेनेकडून कुठलाही सदस्य नियुक्त झाला नाही. विरोधकांनी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केला नसावा.
आमदार विक्रम पाचपुते
नामनिर्देशित सदस्यपदाच्या निवडी पूर्णतः राजकीय दबावाखाली पार पडल्या आहेत. जिल्हाप्रमुखांची शिफारस असताना आमचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत
मनोहर पोटे
श्रीगोंद्याचे आराध्य दैवत श्री संत शेख महंमद महाराज मंदिराचे काम फक्त पाचपुते कुटुंबीय मार्गी लावू शकतात.
अमीन शेख, स्वीकृत सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT