नगर: अकोले तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, या तालुक्यातील लाडगाव, आंबेवंगण या दोन गावांसह चार वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या गावांसाठी एक शासकीय टँकर मंजूर केला असून, या टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरूही झाला आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, लाडगाव, आंबेवंगण व चार वाड्यांचा टँकर मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाला होता. तपासणी करून या गावांना टँकर सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंजुरी दिली.
पाणीटंचाई असल्यास प्रस्ताव द्या
ज्या गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. त्यांनी रीतसर प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून गावातील पाणीपातळीची तपासणी केली जाणार आहे. आवश्यकता असेल त्या ठिकाणी टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.
टंचाई निवारणार्थ 29 कोटींची आराखडा
उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतात. त्यातून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा 30 जून 2026 पर्यंत 537 गावे आणि 2 हजार 63 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरली आहे. या गावांतील पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसाठी 29 कोटी 45 लाख 98 हजार रुपये खर्चाचा संभाव्य कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.