Maharashtra Honeytrap Case Pudhari
अहिल्यानगर

Honeytrap Case: टाकले खोट्या प्रेमाचे जाळे.. महिलेला रंगेहात पकडले..!; खंडणी उकळणार्‍या तीन महिलांविरुद्ध गुन्हा

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन

पुढारी वृत्तसेवा

अकोलेः एका तरुणावर खोट्या प्रेमाचे जाळे टाकून, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रक्कम (खंडणी) घेणार्‍या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. प्राजक्ता मुंगसे (रा. सिन्नर) असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, मुगसे या खंडणी बहाद्दर महिलेला साथ देणार्‍या आणखी दोन महिलांविरुद्ध विविध कलमांन्वय्ये अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोले शहरात ‘हनी ट्रॅप’ ची सिनेस्टाईल घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. (Latest Ahilyanagar News)

संगमनेर तालुक्यातील एका तरुणाने या प्रकरणी अकोले पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. दोन महिन्यांपूर्वी संगमनेर येथे राहणार्‍या कविता विशाल विधाते या महिलेसोबत त्याची ओळख झाली होती. एकमेंकांचा मोबाईल नंबर घेवून, ते दररोज बोलत होते. या महिलेसमवेत वडगाव पान येथे तो गेला असता, ‘मला तुम्ही आवडता,’ असे म्हणत तिने प्रेमाची मागणी केली होती.

कविता हिने त्या तरुणाला अकोले येथील मैत्रीण छाया धुमाळ हिचा मोबाईल नंबर दिला. त्याने, छाया धुमाळ हिला कॉल केला असता, ती म्हणाली की, तुम्हाला प्रेम करायला कवितासारख्या महिला मी देते, तुम्ही अकोले येथे या,’ असे सांगत, तिने त्याला एका इसमाचा मोबाईल नंबर दिला. या इसमाने तरुणाला खडी क्रेशरजवळील खोलीमध्ये नेले. तेथे एकजण त्याला म्हणाला की, ‘ही माझी पत्नी आहे, तू हिच्यासमवेत काय करीतोस,’ असे म्हणत, त्याने मोबाईलमधून व्हिडिओ शुटींग सुरु केले. तरुणाला धमकी देत, मारहाण केली. ‘ती महिला तरुणाला धमकावित म्हणाली की, हे प्रकरण मिटवायचे असेल तर, आम्हाला एक लाख रुपये दे. प्रकरण येथेच मिटवू. रक्कम न दिल्यास मी पोलिस स्टेशनमध्ये जाईल. तुझ्याविरुध्द तक्रार दाखल करील, अशी धमकी दिली.

यानंतर तरुणाने तिला 7 हजार रुपये दिले. यानंतर पुन्हा 15 हजार रुपये त्या महिलेस फोन- पेद्वारे दिले. यानंतर, ‘उरलेली रक्कम मला द्या, अन्यथा मी पोलिसात तक्रार दाखल करील, अशी धमकी तिने दिली. घाबरलेल्या अवस्थेत तरुणाने तिला 45 हजार रुपये दिले. पुन्हा फोन- पे नंबरवर 10 हजार रुपये पाठविले. पुन्हा संगमनेर बस स्थानक येथे 14 हजार रुपये दिले, परंतू तरुणाला मोबाईल कॉल करुन, ‘आज रक्कम न दिल्यास, ‘त्या दिवस’ चा व्हिडिओ व्हायरल करील,’ अशी धमकी ती देत होती. मी तुम्हाला रक्कम देतो, परंतू माझा व्हिडीओ व्हायरल करु नका,’ असे म्हणत, तरुणाने कॉल कट केला, परंतू त्या महिलेच्या दररोजच्या जाचासह धमक्यांना कंटाळून अखेर तरुणाने, अकोलेचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना सर्व घटना कथन केली. यानंतर पुन्हा प्राजक्ता मुंगसे या महिलेने तरुणाकडे रकमेची मागणी केली असता, त्याने 6 हजार रुपये दिले. तरुणाच्या हातातून सहा हजार रुपये घेताच, पोलिसांनी पंचांसमक्ष प्राजक्ता रावसाहेब मुंगसे हिला रंगेहात ताब्यात घेतले.

कविता विशाल विधाते, छाया संजय धुमाळ व प्राजक्ता रावसाहेब मुंगसे या महिलांनी कटकारस्थान रचून, तरुणाच्या ओळखीचा गैरफायदा घेवून, धमकावणे, मारहाण करुन, बळजबरी खंडणी स्वरुपात रोकड उकळून त्याची फसवणूक केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक खांडबहाले करीत आहे.

‘खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून, खंडणी उकळणार्‍या पिडित तरुणाची ‘आप बिती’ ऐकून 84 हजार रुपये उकळणार्‍या प्राजक्ता मुंगसे ( रा. सिन्नर) या महिलेला पिडीत इसमाकडून उर्वरित 6 हजार रुपये घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राजक्ता मुंगसे या महिलेला मदत करणार्‍या कविता विशाल विधाते ( रा. सगमनेर) व छाया संजय धुमाळ (रा. अकोले) या तीन महिलांविरोधात अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर खोट्या प्रेमाचे जाळे टाकून, ‘हनी ट्रॅप’चे व्हिडिओ काढून, ते व्हायरल करण्याच्या दबावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार घडल्यास, पिडितांनी याबाबत अकोले पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधित पिडित पुरुषाचे नाव गुपित ठेवले जाईल.
-मोहन बोरसे, पोलिस निरीक्षक, अकोले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT