https://www.youtube.com/watch?v=2eXDh9OivQgअकोलेः अकोले शहरात दरवर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढतच आहे. यंदा तब्बल 19 इमारतींना नगरपंचायतीने धोकादायक जाहीर करुन, नोटीस बजावल्या आहेत. विशेष असे की, जिविताला धोका असुनही तेथेच बस्तान बांधून, प्रशासनाच्या नोटीसांकडे घरमालक दुर्लक्ष करीत आहेत. अशा बेफिकिर मालकांविरुद्ध नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत नाही. परिणामी धोकादायक इमारतींचा वाढता धोका पाहता ही बाब गंभीर मानली जात आहे. (Ahilyanagar Latest Update)
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अकोले नगरपंचायत प्रशासन धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते. इमारत किती वर्षांपूर्वी बांधली आहे. यापूर्वी भिंतींची पडझड झाली आहे का, सध्य स्थिती कशी आहे आदी बाबी तपासल्या जातात. इमारत मालकांसह इतरांच्या जिवितास धोका ठरण्याची शक्यता असलेल्या धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात करुन, मालकांना नोटीस बजावल्या जातात, पण, नोटीस दिल्यानंतर किती इमारती पाडण्यात आल्या, किती रिकाम्या केल्या, याबाबतची पारदर्शक माहिती मिळत नाही. अनेक इमारतींच्या मालकांना वारंवार नोटीस बजावूनही त्या जैसे-थे उभ्या आहेत. परिणामी अशा इमारती कोसळण्याची भिती कायम आहे.
याप्रश्नी केवळ नोटीस देणे ही औपचारिकता न करता, प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी जागरुक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. ज्या इमारती अत्यंत धोकादायक ठरतात, त्या तत्काळ रिकाम्या करून, नियमानुसार पाडव्या, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
अकोले शहराच्या जुन्या भागात धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून यंदा जून महिन्यात शहरातील विविध भागात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. जिवितास हानी पोहोचू शकते, अशा इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती शहराच्या जुन्या भागात आहेत. काही मालमत्ताधारक धोकादायक इमारत स्वतःहून पाडतात, तर काहीजण मात्र, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव चित्र पहायला मिळत आहे. ज्यांना नोटीस बजावली त्यांनी आवश्यक उपाययोजना केल्या किंवा नाही, याची शहानिशा नगरपंचायतीने करणे गरजेचे आहे.