लव्ह जिहाद AI Image
अहिल्यानगर

Love Jihad | लव्ह जिहाद प्रकरणाने शहरात खळबळ; चार वर्षांच्या मुलासह पत्नीला नाकारलं, पीडितेची महिला आयोगाकडे धाव

Love Jihad | पीडित तरुणीची न्यायासाठी राज्य महिला आयोगाकडे धाव, पोलिसांत यापूर्वीच गुन्हा दाखल; शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

अहिल्यानगर

प्रेमाच्या जाळ्यात ओढून, आंतरधर्मीय विवाह करून आणि चार वर्षांच्या मुलाला जन्म दिल्यानंतर आता पती आपल्याला आणि मुलाला स्वीकारण्यास नकार देत असल्याची धक्कादायक तक्रार एका पीडित तरुणीने केली आहे. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा गंभीर आरोप करत, पीडितेने न्यायासाठी थेट राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणी तिने यापूर्वीच पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा जगासमोर मांडली आहे.

अशी झाली फसवणूक

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात शहरातील प्रसिद्ध कापड बाजारात झाली. तिथे एका दुकानात तिची ओळख जुनेद शेख नावाच्या तरुणाशी झाली. या ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. जुनेदने तिला लग्नासह विविध प्रकारची आमिषे दाखवली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडितेने २०१९ मध्ये कापूरवाडी येथील एका घरात त्याच्याशी आंतरधर्मीय विवाह केला.

विवाहित असल्याचे लपवले, कुटुंबापासून ठेवले दूर

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जुनेद शेख हा आधीपासूनच विवाहित होता आणि ही गोष्ट त्याने पीडितेपासून पूर्णपणे लपवून ठेवली होती. लग्नानंतर त्याने तिला आपल्या घरी न नेता, शहरातीलच एका वस्तीत भाड्याच्या घरात ठेवले. या काळात त्यांना एक मुलगाही झाला, जो आता चार वर्षांचा आहे.

जाब विचारताच मारहाण आणि दबाव

"मला तुझ्या घरी का घेऊन जात नाहीस?" असा जाब पीडितेने विचारण्यास सुरुवात केली असता, जुनेदने तिला वारंवार मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांकडूनही तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता आणि तिला धमकावले जात होते, असा आरोपही पीडितेने केला आहे.

न्यायासाठी लढा सुरू

अखेरीस जुनेदने तिला आणि मुलाला स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिल्याने पीडितेने न्यायासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्यासोबत झालेल्या विवाहाचे सर्व पुरावे (फोटो, कागदपत्रे) सादर केले आहेत. या प्रकरणी तिने आधी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आता अधिक न्यायाच्या अपेक्षेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. "मला आणि माझ्या निष्पाप मुलाला न्याय मिळावा, फसवणूक करणाऱ्या जुनेदवर कठोर कारवाई व्हावी," अशी मागणी तिने केली आहे.

या प्रकरणामुळे अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली असून, 'लव्ह जिहाद'च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता पोलीस आणि महिला आयोग या प्रकरणी काय कारवाई करतात आणि पीडितेला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT