गर: जिल्ह्यातील ४ लाख १५ हजार ९१६ मतदारांचे गणना प्रपत्र अद्याप असंकलित आहेत. त्यामुळे या मतदारांच्या अर्जांविना जिल्ह्याची प्रारुप मतदारयादी २४ ऑगस्टला प्रसिध्द होणार आहेत. दरम्यान, अहमदनगर शहर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि कर्जत-जामखेड या पाच विधानसभा मतदारसंघाचे ‘एसआरआय’चे कामकाज शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे कामकाज गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. जिल्हाभरातील बारा विधानसभा मतदारसंघांत ३८ लाख १० हजार १०२ मतदार समाविष्ट आहेत.
मतदारयादी बिनचूक आणि अद्ययावत करण्यासाठी एसआयआर कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. मतदारयादीतील मतदारांना बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गणना प्रपत्र वाटप करण्यात आले आहे. मात्र, गेल्या महिनाभरात ४ लाख १५ हजार ९१६ मतदारांचे अर्ज अद्याप असंकलित आहेत.
यामध्ये १ लाख ३९ हजार ६८० मयत, ५९ हजार ५८८ दुबार मतदार आढळून आले आहेत. ४७ हजार ७५७ मतदारांचा शोधच लागला नाही. तर १ लाख ६७ हजार ७१६ मतदार स्थलांतरित आहेत.
त्यामुळे एकंदरीत ४ लाख १५ हजार ९१६ मतदारांची नावे प्रारुप मतदारयादीत समावेश होणार नाहीत. त्यामुळे जवळपास ३३ लाख ९४ हजार मतदारसंख्या असलेली प्रारुप मतदारयादी २४ ऑगस्टला प्रसिध्द होणार आहे.
मात्र, दावे व हरकतीवेळी स्थलांतरित असलेल्या १ लाख ६७ हजार ७१६ मतदारांना पुरावा दाखवत नाव नोंदणीची संधी उपलब्ध असणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.
श्रीरामपूर, शिर्डी व कोपरगावही शंभर टक्के
चार दिवसांपूर्वी अहमदनगर शहर, कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघांचे ‘एसआयआर’चे कामकाज शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. यामध्ये आता श्रीरामपूर, कोपरगाव आणि शिर्डी या तीन विधानसभा मतदारसंघांचेही ‘एसआयआर’चे कामकाज शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
राहुरी मतदारसंघांसह उर्वरित सात विधानसभा मतदारसंघाचे कामकाज ९९ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या एक-दोन दिवसांत या मतदारसंघांचेही कामकाज शंभर टक्के पूर्ण होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गाढे यांनी सांगितले.