नगर: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला असून, बीएलओंच्या मंगळवारपासून घरभेटी सुरु झाल्या आहेत. मतदारांनी गणना प्रपत्र अचूक भरून संबंधित बीएलओकडे सादर करावे, असे आवाहन नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. जो कोणी गणना प्रपत्र भरुन देणार नाहीत. अशा मतदारांचे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास मंगळवारपासून (दि.३०) प्रारंभ झाला. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील बोलत होते.
यावेळी नगरचे नायब तहसीलदार सुधीर उबाळे, कैलास साळुंके, माहिती अधिकारी अमोल महाजन आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी पाटील म्हणाले की, या कार्यक्रमाचा मूळ उदृदेश मतदारयादी नव्याने तयार केली जाणार आहे.
त्यासाठी २९७ मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या मार्फत मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म-ईएफ) भरुन घेतले जात आहेत.
बीएलओ मतदारांच्या घरी जाताना संबंधित मतदारांची माहिती एका गणना प्रपत्रात भरुन ती मतदारांना वाचून दाखविणार आहेत. माहिती चुकीची असल्यास भरलेले प्रपत्र नष्ट केले जाऊन दुसर्या प्रपत्रात मतदारांकडून ते सविस्तर भरुन घेतले जाणार आहे. हा कार्यक्रम २९ जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.
पाटील यांनी पुढे सांगितले की, या मतदारसंघातील ७१ टक्के मतदारांची मॅपिंग झाले आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले. त्या मतदारांनी गणना प्रपत्र भरुन दिल्यास त्याचे नाव ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदारयादीत समाविष्ट होणार आहे.
ज्याजे मॅपिंग झाले नाही, अशा मतदारांकडूनदेखील गणना प्रपत्र भरुन घेतले जाणार आहे. मात्र या मतदारांना सुनावणीला उपस्थित राहावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
१.२३ लाख मतदारांची होणार सुनावणी
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील ९१ हजार मतदारांनी मॅपिंग केलेले नाही. तसेच विसंगती आढळून आलेल्या ३२ हजार अशा १ लाख २३ हजार मतदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीसाठी अनुपस्थित राहणार्या मतदारांचे नाव मतदारयादीत समाविष्ट होणार नसल्याचे पाटील यांनी म्हटले.
घर बंद आढळल्यास पंचनामा
गणना प्रपत्र भरुन घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जात आहेत. मतदारांची घरे बंद आढळून आल्यास, बीएलओ त्या बंद घरांच्या फटीतून गणना प्रपत्र टाकणार आहेत. त्यानंतर बीएलओ तीन दिवस त्या घरी भेटी देणार आहेत. घर बंदच आढळून आल्यास शेजारील नागरिकांची मदत घेऊन पंचनामा केला जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले आहे.