नगर: संत बाळूमामांचे कार्य म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे. त्यांनी समाजामध्ये श्रद्धा, एकता आणि परस्पर प्रेमाची भावना जागवली. या अभूतपूर्व सोहळ्यामुळे मनाला अपार आनंद आणि समाधान लाभले, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. संत बाळूमामाच्या जयघोषात बोल्हेगाव वाकळे मळा परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला. पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन, हरिनाम आणि महाआरतीच्या कार्यक्रमाने परिसर भक्तीमय झाला.
या सोहळ्यात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, अशोक महाराज पालवे, नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे, आकाश कातोरे, नितीन शेळके, पंकज वाकळे आदींसह भाविक उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी विकासाच्या योजनांसोबतच अध्यात्मिकतेचा वारसा जोपासला आहे. समाजाचे सर्व घटक एकत्र आणणारे आणि भक्तीमयतेचा संदेश देणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. संत बाळूमामा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कीर्तन सोहळ्यात संतांच्या विचारांचे व अभंगांचे गोड स्वर वातावरणात दुमदुमले. भाविकांनी टाळ, मृदुंगाच्या निनादात बाळूमामाच्या नावानं चांगभलं या जयघोषात सहभाग घेतला.
वाकळे मळा बनला पंढरपूर
भक्तीचा रंग एवढा दाटला की वाकळे मळा परिसर जणू भक्तीचा पंढरपूर बनला. महाआरतीनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.