Revenue Canteen Charges Pudhari
अहिल्यानगर

Revenue Canteen Charges: चहा १५ रुपये... खाद्यपदार्थांचे दर अधिक... डबा खाल्ल्यास चार्ज; कोकाटे यांची चौकशीची मागणी

रेव्हेन्यू कॅन्टीनमध्ये ग्रामीण शेतकऱ्यांची लूट

पुढारी वृत्तसेवा

चिचोंडी पाटील: चहा १५ रुपये... घरचा डबा आणून खाल्ल्यास प्रतिव्यक्ती ३० रुपये टेबल चार्ज... खाद्यपदार्थांचे दर अधिक... अशा प्रकारची कथित आर्थिक लूट रेव्हेन्यू कॅन्टीनच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांची सुरू आहे.

नगर तालुक्यातील ग्रामीण भागातून शासकीय कामांसाठी शहरात येणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची रेव्हेन्यू कॅन्टीनच्या माध्यमातून कथित आर्थिक लूट होत असल्याचा आरोप पुढे आला आहे.

घरून आणलेला डबा कॅन्टीनमध्ये खाल्ल्यास टेबल चार्ज आकारला जात असल्याची तक्रार असून, खाद्यपदार्थ व पेय पदार्थांच्या दराबाबतही पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी केली आहे.

कोकाटे यांनी स्वतः या रेव्हेन्यू कॅन्टीनला भेट दिल्यानंतर काही बाबी निदर्शनास आल्याचे कोकाटे यांनी सोसायटीच्या चेअरमन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांचे दर अधिक असल्याचे जाणवले; मात्र अधिकृत दरपत्रक अथवा भावफलक दर्शनी भागात लावलेला दिसत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

कॅन्टीनमधील फलकावर चहाचा दर १५ रुपये असून, घरचा डबा आणून खाल्ल्यास प्रतिव्यक्ती ३० रुपये टेबल चार्ज आकारण्यात येईल, अशी सूचना असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले आहे. या शुल्काला सोसायटीची मान्यता आहे का, त्याचा नियम काय आणि दर कोणत्या आधारावर निश्चित केला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेव्हेन्यू कॅन्टीनमध्ये येणारे ग्रामीण भागातील नागरिक हे विविध शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातून येतात. त्यामुळे खाद्यपदार्थांचे अधिकृत दर स्पष्टपणे दर्शविणे, योग्य दर आकारणे आणि त्यांना घरचा डबा खाऊन देणे हे गरजेचे आहे. कॅन्टीनच्या कारभाराची ताबडतोब चौकशी करून आवश्यक ती सुधारणा व्हावी; अन्यथा लवकरच कॅन्टीनसमोरच जनआंदोलन केले जाईल.
- मनोज कोकाटे, माजी सरपंच, चिचोंडी पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT