नगर: खासदार संजय राऊत यांना आताही कोठूनच प्रसिद्धी मिळत नसल्याने ते स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वादग्रस्त विधाने करतात. खा.राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात ईडीचा प्रसाद घेत अनेक महिने जेलमध्ये काढले. त्यामुळेच सर्व जण त्यांना भ्रष्टाचारीच दिसत असल्याने ते रोजच असे खोटे आरोप करत असतात.
त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंडघशी पडले आहेत. त्यांच्या खोट्या आरोपांना भीक न घालता अहिल्यानगरचा विकास वेगाने चालू ठेवणार आहे, अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी विरोधकांवर पलटवार केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत अहिल्यानगरमध्ये महापालिकेने 300 ते 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्याला आ. जगताप यांनी मुंबईतून उत्तर दिले. ते म्हणाले, की आमच्या माता भगिनींसाठी रोज टीव्हीवरील मनोरंजनात्मक सिरीयल असतात तसे खा.राऊत यांचे रोज सकाळचे वक्तव्य व आरोप सर्वांसाठी मनोरंजनाचे साधन आहेत. (Latest Ahilyanagar News)
त्यांना फार कोणी गांभीर्याने घेत नाही. सत्तेत असताना त्यांना कोणताच विकास करता आला नाही. आताही कोठूनच प्रसिद्धी मिळत नसल्याने ते आमच्यासारख्या काम करणार्यांवर खोटे आरोप करत प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत.
अहिल्यानगरला बदनाम करण्यासाठी शहरातील काही ब्लॅकमेलर लोक त्यांना खोटी माहिती देत आपली दुकानदारी चालू ठेवत असतात. अशांच्या ब्लॅकमेलिंगमुळे अहिल्यानगरमध्ये काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा ब्लॅकमेलरांच्या आरोपांकडे नगरकर कायमच दुर्लक्ष करत असल्याने ते अनेकदा तोंडघशी पडले आहेत.
अहिल्यानगर महापालिकेत 300 ते 400 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार खा.राऊत यांना झाला आहे. मात्र त्यांनी ज्या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, त्या काळात तुमच्याच शिवसेनेची सत्ता महापालिकेत होती व तुमचेच महापौर व नगरसेवक सत्ता भोगत होते.
मग त्या वेळी हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसला नाही का? जर एवढा मोठा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असता, तर एकही सिमेंटची गोणी रस्त्यावर पडली नाही, असा याचा अर्थ होतो. मात्र आज शहरातील रस्त्यांची कामे व दर्जा काय आहे हे नगरकर अनुभवताहेत. अहिल्यानगरची जनता फार सुज्ञ व चाणाक्ष आहे. म्हणूनच जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोनदा महापौर व तीनदा आमदार होण्याची संधी दिली, असेही आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.