Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Special Meeting: अहिल्यानगर महापालिकेची 26 फेब्रुवारीला विशेष सभा; समिती व स्वीकृत नगरसेवक निवड

स्थायी तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड; सहा स्वीकृत नगरसेवक ठरणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या दोन विशेष सर्वसाधारण सभा 26 फेब्रुवारी रोजी महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. त्यात स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेच होणाऱ्या दुसऱ्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीला निर्भेळ यश मिळाले. राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौरपदी आणि भाजपचे ॲड. धनंजय जाधव उपमहापौरपदी बिनविरोध विराजमान झाले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य व महिला व बालकल्याण समिती सदस्य होण्याचे डोहाळे अनेकांना लागलेे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची प्रतीक्षा केली जात आहे. अखेर या निवडीसाठी महापौरांच्या सहीने नगरसचिव विभागाने 26 फेब्रुवारी रोजी सकाळी विशेष सभा होणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही समित्यांमध्ये 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गटनेते नियुक्त केलेल्या सदस्यांची नावे सभेच्या आदल्या दिवशी बंद पाकिटांमध्ये महापौरांकडे देणार आहेत. त्याची एक प्रत आयुक्तांना देण्यात येईल.

अशी होणार सदस्यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भाजप 6, शिवसेना 2, काँग्रेस 1 एमआयएम 1 असे सदस्य स्थायी समितीत असतील. या पक्षांच्या गटनेत्यांनी दिलेली पाकिटे सकाळी सभा सुरू झाल्यानंतर महापौर क्रमाक्रमाने उघडतील. तत्पूर्वी ही पाकिटे आधी कोणी उघडलेली नाहीत याची खात्री करण्यात येईल. मग महापौर क्रमाने सर्वांसमोर उघडलेल्या पाकिटांतील नावे सभागृहात वाचतील. या नावांवर गटनेत्यांना आक्षेप नसल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडेल.

आक्षेप आल्यास दुसरा लखोटा उघडणार

महापौरांनी सदस्यांची नावे वाचून दाखविल्यानंतर एखाद्या नावास आक्षेप असल्यास आयुक्तांकडे दिलेला बंद लखोटा उघडण्यात येईल. महापौरांकडील लखोटा आणि आयुक्तांकडील लखोट्यात एकच नाव आहे की नाही, याची खातरजमा करण्यात येईल. समान नावे नसल्यास पूर्वी दिलेले नाव रद्द करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा गटनेता लेखी स्वरूपात नावे देईल. त्यानुसार निवडीची प्रक्रिया होईल.

यंदा असतील सहा स्वीकृत नगरसेवक

महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी 26 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विशेष सभा होणार आहे. निर्वाचित एकूण 68 सदस्यसंख्येला अनुसरून शासनाच्या तरतुदीनुसार 6 स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. गेल्या वेळेपेक्षा यंदा एक सदस्य जास्त राहणार आहे. आयुक्त, पक्षांच्या गटनेत्यांशी विचारविनिमय करून गटांचे तौलनिक संख्याबळ लक्षात घेऊन योग्य व्यक्तींची शिफारस करतील. तीन पक्षांच्या गटनेत्यांकडून बंद लखोट्यात स्वीकृत सदस्यांची नावे येतील. महापौर ती नावे वाचून दाखवतील. त्यात राष्ट्रवादीतर्फे 3, भाजप 2 व शिवसेना 1 अशी 6 स्वीकृत सदस्यांची निवड होईल.

स्वीकृत नगरसेवकासाठी पात्रता

  • वैद्यकीय व्यवसायात किमान पाच वर्षाचा अनुभव

  • निवृत्त प्राध्यापक, मुख्याध्यापक व पाच वर्षे शिक्षणतज्ज्ञ म्हणून अनुभव

  • सनदी लेखापाल म्हणून पाच वर्षे अनुभव

  • अभियांत्रिकी पदवी व पाच वर्षे अनुभव

  • कायद्याची पदवी व पाच वर्षे अनुभव

  • सामाजिक संस्थेचा पदाधिकारी व पाच वर्षांचा अनुभव

  • सेवानिवृत्त सहायक आयुक्त, उपायुक्त, आयुक्त

काँग्रेसची दोन्ही पदे रिक्त राहण्याची शक्यता

महापालिकेत काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे स्थायी आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये काँग्रेसच्या प्रत्येकी एखा सदस्याला संधी मिळणार आहे. परंतु, त्यासाठी काँग्रेसने गटनेता निश्चित करणे गरजेचे होते. मात्र काँग्रेसने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी न केल्याने नाव देण्याचा अधिकार त्यांना मिळणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सदस्य संख्या स्थायी समिती

  • राष्ट्रवादी 6

  • भाजप 6

  • शिवसेना 2

  • काँग्रेस 1

  • एमआयएम 1

महिला व बालकल्याण

  • राष्ट्रवादी 6

  • भाजप 6

  • शिवसेना 2

  • काँग्रेस 1

  • एमआयएम 1

स्वीकृत नगरसेवक संख्या

  • राष्ट्रवादी 3

  • भाजप 2

  • शिवसेना 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT