नगर: महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर केलेले सन 2025-26 चे सुमारे 1680 कोटींचे अंदाजपत्रक (बजेट) आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आज महासभेत मांडून त्यास मंजुरी दिली. या बजेटमध्ये गेल्या वर्षीपेक्षा शंभर कोटींनी वाढ झाली.
यामध्ये आयुक्त डांगे यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर भर दिल्याचे दिसून येते. पाणीपट्टी वाढवण्यात आली असून, छुप्या मालमत्ता शोधून मनपाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 12) आयुक्त डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपायुक्त विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त निखिल फराटे, सपना वसावा, प्रियंका शिंदे, मुख्य व लेखा वित्त अधिकारी सचिन धस, नगरसचिव मेहेर लहारे, अनिल लोंढे, शहर अभियंता मनोज पारखे आदी उपस्थित होते.
महापालिकेत पदाधिकार्यांची मुदत संपल्यानंतर दुसर्यांदा प्रशासक म्हणून आयुक्तांनी अर्थसंकल्प मांडला. स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर बुधवारी मुख्य लेखाधिकारी डॉ. सचिन धस यांनी महासभेत 1680 कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक महासभेचे अध्यक्ष तथा आयुक्त डांगे यांच्याकडे सादर केले. त्यास डांगे यांनी मंजुरी दिली. त्यात महसुली उत्पन्न 452 कोटी 3 लाख; तर भांडवली जमा 1159 कोटी 5 लाख रुपये आहे.
अर्थसंकल्पाते महसुली उत्पन्नामध्ये संकलित करात दहा कोटींची वाढ दाखविली आहे. जीएसटी अनुदानामध्येही दहा कोटींची वाढ असून, पाणीपट्टीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. महसुली अनुदानात तीन कोटींची वाढ दाखविण्यात आली आहे. शहरात राबविण्यात येणार्या योजनांसाठी महापालिका राष्ट्रीयीकृत बँकांकडून 150 कोटींचे कर्ज घेणार आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 1560 कोटींचा होता.
महापालिका हद्दीतील नागरिकांना सर्व पायभूत सुविधा देण्यावर प्रशासनाचा भर आहे. शहर विकसित करून नागरिकांना निरोगी व आनंददायी वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शहर फक्त राहण्यापुरते मर्यादित न राहता ते एक विकास केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे.- यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक