संदीप रोडे
अहिल्यानगर शहराच्या आधीपासून अस्तित्वात असलेले भिंगार हे यादव, बहामनी, निजामशाही, पेशवाई, तसेच ब्रिटिश राजवटीचे साक्षीदार. मात्र भिंगारला महापालिकेत घेण्याचा विषय आला आणि प्रशासनाच्या पोटात गोळा आला. भौगोलिक सलगता नसल्याचं त्यामागचं कारण (!) एकूणच भिंगारच्या समावेशाला अहिल्यानगर महापालिका कानकूस करत आहे. ब्रिटिशांची अखेरची खूण असलेले कॅन्टोमेंट बोर्ड नामशेष करत तो भाग नजीकच्या महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरू असतानाच महापालिकेने ही भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र भिंगारला स्वतंत्र नगरपंचायत वा नगरपरिषद करण्याची शिफारस केली आहे. आता भिंगार महापालिकेत येणार की स्वतंत्र नगरपंचायत होणार, की आणखी काही, याकडे भिंगारकरांच्या नजरा लागल्या असणार हे नक्की.
महापालिकेचा आस्थापना खर्च 75 टक्क्यांवर पोहोचला असून अशातच कॅन्टोमेंटचे 159 कर्मचारी, सेवानिवृत्त 236 कर्मचार्यांच्या वार्षिक सुमारे 18 कोटींच्या वेतनाचा भार महापालिकेवर पडणार आहे. तो महापालिकेला न पेलवणारा आहे. एकूणचा हा सगळा ताळमेळ पाहता महापालिकेला अवमेळाची भीती वाटते आहे, त्यामुळेच भिंगारला महापालिकेत घेण्याच्या चर्चेनेच प्रशासनाच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे.
कॅन्टोमेंटचा कारभार ब्रिटिशकालीन 1924 च्या नियमानुसार चालतो. त्या जाचक नियमांमुळे कॅन्टोमेंटचे (भिंगारचे) रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. कॅन्टोमेंट बरखास्त करून महापालिकेत समाविष्ट करावा, अशी त्या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र अहिल्यानगर महापालिकेला भिंगारचे ओझे जड झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
ब्रिटिशांची शेवटची ओळख असलेले देशभरातील कॅन्टोमेंट बोर्ड शेजारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. देशातील 62 (महाराष्ट्रातील 7) कॅन्टोमेंट बरखास्त करत तो भाग नजीकच्या महापालिकेत समाविष्ट करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने लगतच्या प्रत्येक महापालिकेकडून तसा अहवाल मागविला आहे. अहिल्यानगर महापालिकेने मात्र भिंगार कॅन्टोमेंट समाविष्ट करण्यास असमर्थता दर्शविली आहे. भौगोलिक सलगता नसल्याने तेथील नागरिकांना सुविधा पुरविण्याची अडचण महापालिकेला वाटते आहे. त्यातच कॅन्टोमेंटच्या 11 नागरी सुविधा (व्यापारी संकुल, बाजारातील गाळे, ओटे) हस्तांतरणास कॅन्टोमेंटने नकार दर्शविला आहे. खरे तर हेच उत्पन्नाचे खरे स्रोत आहेत, तेच हस्तांतर होणार नसतील तर महापालिकेचा आर्थिक गाडा चालणार कसा, हा प्रश्नच आहेे.
महापालिकेचा आस्थापना खर्च 75 टक्क्यांवर पोहोचला असून अशातच कॅन्टोमेंटचे 159 कर्मचारी, सेवानिवृत्त 236 कर्मचार्यांच्या वार्षिक सुमारे 18 कोटींच्या वेतनाचा भार महापालिकेवर पडणार आहे. तो महापालिकेला न पेलवणारा आहे. एकूणचा हा सगळा ताळमेळ पाहता महापालिकेला अवमेळाची भीती वाटते आहे, त्यामुळेच भिंगारला महापालिकेत घेण्याच्या चर्चेनेच प्रशासनाच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे.
कॅन्टोमेंटचा कारभार ब्रिटिशकालीन 1924 च्या नियमानुसार चालतो. त्या जाचक नियमांमुळे कॅन्टोमेंटचे (भिंगारचे) रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. कॅन्टोमेंट बरखास्त करून महापालिकेत समाविष्ट करावा, अशी त्या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र अहिल्यानगर महापालिकेला भिंगारचे ओझे जड झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
2003 मध्ये अहिल्यानगरच्या नगरपरिषदेची महापालिका झाली. त्या वेळी केडगाव, बुरूडगाव, बोल्हेगाव, फकिरवाडा, नागापूर ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. पुढे बुरूडगाव महापालिका क्षेत्रातून वगळले. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सहजरित्या सुविधा उपलब्ध होतात. महापालिकेचे नियम कॅन्टोमेंटच्या तुलनेत फार जाचक नाहीत. वडिलोपार्जित जागा नावावर करायची असो की हस्तांतरण, त्यासाठी लीगल हेअर सर्टिफिकेट (पूर्वजांची कुंडली) कॅन्टोमेंटच्या नियमानुसार लागते. ते मिळविण्यासाठी खर्च होतोच होता; पण हेलपाटेही मारावे लागतात. कॅन्टोमेंट क्षेत्रात 1 एफएसआय आहे. त्यामुळे कमी जागेत जास्तीचे बांधकाम करण्यालाही मर्यादा आहेत. त्यातच अर्धे भिंगार लीज लॅण्डवर वसलेले आहे. त्यावर घर बांधायचे ठरले, तर भिंगारकरांना कर्जासाठी बँका दारातही उभे करत नाहीत. परिणामी दाटीवाटीच्या वस्तीत भिंगारकरांचा जीव गुदमरत असल्याचे वास्तवही नाकारून चालणार नाही. मिलिटरीला भरपेट पाणी मिळाल्यानंतर उरलेले पाणी भिंगारकरांना मिळते, तेही वर्षाला 2200 रुपये पाणीपट्टी आकारून (देशात सर्वांत महाग पाणी असल्याचा नागरिकांचा दावा). देशाच्या संरक्षण विभागाकडून कॅन्टोमेंटला वर्षाकाठी काही फंड मिळतो. त्यातून पगार, प्रशासन आणि नंतर भिंगारच्या विकासावर खर्च केला जातो. फंड आणि खर्चाचा ताळमेळ पाहता भिंगार विकासाची आशाच मावळतीला गेल्याचे हे लक्षण आहे. कॅन्टोमेंट क्षेत्र संपताच सुरू होणारा विजय लाईन चौक मात्र भरभराटीला आला आहे. भिंगारलगतचा हा भाग नागरदेवळे परिसर गणला जातो. कॅन्टोमेंटच्या जाचक अटी-नियमांना कंटाळून भिंगारकरांनाही महापालिकेत यावेसे वाटते आहे. मात्र अहिल्यानगर महापालिकेला भिंगार नकोसे झाले आहे. नागरदेवळे नगरपरिषदेची अधिसूचना मविआ सरकारच्या काळात निघाली होती, मात्र राजकीय साठमारीत ती रद्द झाली. आता भिंगारला नगरपंचायत/नगरपरिषद करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारला धाडला जाणार आहे. जिल्हा प्रशासनालाही महापालिकेची भूमिका रास्त वाटते आहे, त्यामुळेच त्यांनी भोवतालचा परिसर समाविष्ट करून नगरपंचायत/नगरपरिषद करण्याचा पर्याय शासनाला सुचविला असेच, आता म्हणावे लागेल.
महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी भिंगार महापालिकेत नको, असा ठराव करून तो केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. वास्तविक प्रशासक म्हणून त्यांनी काय पाठवायचा तो अहवाल पाठवून द्यायचा होता, त्याची वाच्यता करणे संयुक्तिक नसल्याचे भिंगारकरांचे म्हणणे आहे. महापालिका ही कोणा प्रशासकाची खासगी मालमत्ता नाही. काय पाठवायचा तो अहवाल पाठवा, वाच्यता करू नका, शासन काय तो निर्णय घेईल. उगाच भिंगारकरांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, अशी भूमिका कॅन्टोमेंटचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी मांडली आहे. भिंगार महापालिकेत समाविष्ट झाल्यास भिंगारची प्रगती झपाट्याने होणे शक्य असल्याचा दावाही केला जातोय. शिवाय भिंगारकरांची ब्रिटिशकालीन जाचक नियम-अटींतून सुटकाही यानिमित्ताने होणार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतलेलाच आहे, त्याची अंमलबजावणीही होणारच आहे, त्यामुळे भविष्यात भिंगारकरांमागील जाचक नियमांची कटकट कायमची मिटणार हे खरे, पण भिंगारचा महापालिकेत समावेश होणार की स्वतंत्र नगरपंचायत/नगरपरिषद होणार हे येणारा काळाच ठरवेल.
अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या भिंगारला पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दंडकारण्य असताना जेथे भृगुऋषींचा आश्रम होता, ते ठिकाण म्हणजे भिंगार टेकडी. बाराव्या शतकात भिंगार टेकडीवर देवीचे मंदिर असल्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या ‘स्थान पोथी’मध्ये आढळतो. पानिपतच्या युद्धास जाताना काही काळ पेशव्यांचा मुक्काम भिंगारला होता. पानिपतकडे कूच करण्यापूर्वी त्यांनी ब्राह्मण गल्लीमधील मुळे वाड्यामधील गणपती शुक्लेश्वराला अभिषेक करून बेलभंडारा उधळल्याचा उल्लेख सापडतो. मुघल बादशहा औरंगजेबाने भिंगार परिसरातच अखेरचा श्वास घेतला. सरोष सिनेमागृहावर बॉम्ब फेकणारे स्वातंत्र्यसैनिक हबीबखान, रत्नम पिल्ले, राधकिसन खोमणे हे भिंगारचेच सुपुत्र. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्मही भिंगारचाच.
अहिल्यानगर-भिंगार दरम्यान मिलिटरी एरिया.
विलीनीकरणानंतर कॅन्टोमेंटमधील कर्मचार्यांचे काय?
महापालिका हद्दीत समावेश झाल्यास नागरी सुविधा पुरविणार कशा?
मनपाचा आर्थिक डोलारा ढासळत असताना भिंगारचा समावेश कशासाठी?
भिंगारला पाणीपुरवठा कसा करणार?
नागरी सुविधा हस्तांतरास कॅन्टोमेंटचा नकार
नगरपरिषद झाल्यास कोणता भूभाग जोडला जाणार?