अकोले : पर्यटक स्थळ असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकण खड्यावरून सुमारे १६०० फूट दरीत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे या तरूणाचे नाव आहे. ऋषिकेशचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता. सोमवारी (दि.१०) ऋषिकेशशी फोनवरून संपर्क न झाल्याने आई-वडिल नाशिकला आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी शोध घेतला. तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवारी (दि.११) तो बेपत्ता असल्याची त्यांनी तक्रार दाखल केली. त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता मित्रांनी तो मोटरसायकलवरून हरिचंद्र गडाकडे गेला असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी हरिचंद्र गडाकडे ऋषिकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल पार्किंग केल्याचे दिसून आले. त्यांनतर त्यांनी हरिचंद्र गडाचा परिसर व कोकणकडा परिसरात ऋषिकेशचा शोध घेतला असता कोकण कड्याच्या १६०० फुट खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने ऋषीकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.