नगर: अहिल्यानगरच्या महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु गुरुवारी झालेल्या सोडतीमध्ये महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांना महापौरपदाचे स्वप्न गुंडाळून ठेवावे लागले. दुसरीकडे महापौरपदाचा सस्पेन्स कायम ठेवत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महापौरपदाचा चेंडू शुक्रवारी थेट मुंबईच्या कोर्टात ढकलून दिला.
महापालिकेत राष्ट्रवादी (27 जागा) सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापौरपद राष्ट्रवादीकडेच जाण्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, सध्या तरी राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षांकडून सस्पेन्स पाळला जात आहे. आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ठरवतील तोच महापौर हे निश्चित आहे. मात्र, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
दरम्यान, आमदार जगताप यांनी गुरुवारी, आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ, असे सांगितले; तर डॉ. विखे यांनी शुक्रवारी भूमिका स्पष्ट केली. मुंबईत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महापौर ठरवतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महापौर पदाचा चेंडू थेट मुंबईच्या कोर्टात गेल्याने त्याचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
खुर्चीची तारीख 31 जानेवारी
महापौरांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसचिव विभागाने महापौर निवडीचा कार्यक्रमही शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार 30 ते 31 जानेवारी या दोन दिवसांत महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून नाशिक विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज भरणे आणि दोन्हींची निवड करणे असा कार्यक्रम या दोन दिवसांत होणार आहे. विभागीय आयुक्तांकडून या निवड प्रक्रियेची घोषणा होईल.