नगर: नगर शहरातील ऐतिहासिक ओळख असलेल्या माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींच्या विरोधात अखेर न्यायालयीन लढा उभारण्यात आला असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गटनेते दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करीत प्रशासनाला थेट आव्हान दिले. शहराच्या वारशावर घाला घालणाऱ्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये संताप उसळला असून आता हा वाद न्यायालयात पोहोचला आहे.
जनहित याचिकेत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पुरातत्त्व विभाग, पोलिस अधीक्षक व महापौर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून नगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्ड्यांनी विद्रूप झालेले मार्ग आणि अपूर्ण विकासकामे यावरून प्रशासनावर टीका होत असतानाच माळीवाडा वेस पाडण्याचा मुद्दा समोर आल्याने नागरिकांचा रोष आणखी वाढला आहे. शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेला अचानक ऐतिहासिक वास्तू पाडण्याची घाई का झाली, असा सवाल उपस्थित होत आहे.
माळीवाडा वेस ही सुमारे चारशे वर्षांची ऐतिहासिक वास्तू असून तिचे जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना उलट ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अहिल्यानगर शहरातील जनतेत संताप व्यक्त होत आहे. सहा महिन्यांन पूर्वीच या विरोधात नितीन भुतारे यांनी आवाज उठवत नागरिकांना जागरूक केले होते.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. माळीवाडा परिसरातील बाळासाहेब बोराटे, सुरेखा कदम, मंगलताई लोखंडे, दत्ता कावरे नगरसेवकांनी वेस पाडण्यास कडाडून विरोध दर्शवला, तर सत्ताधाऱ्यांनी ‘विकास’ या नावाखाली येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा मुद्दा पुढे करत वेस पाडण्याची भूमिका घेतली. या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा रंगू लागली आहे.
याचिकेसोबत माळीवाडा वेश ऐतिहासिक असल्याचे पुरातत्त्व विभागाचे पत्र, चारशे वर्षांचा इतिहास, तसेच यापूर्वी नागरिकांनी दाखल केलेल्या सुमारे 2 हजार हरकतींचा तपशीलही न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. दुसरीकडे याचिका दाखल करताना कावरे यांनी दिल्लीच्या पुरातत्व विभागाचे काही दाखले सुद्धा या समवेत दिलेले आहेत. लवकरच पुढील प्रक्रिया होण्याची अपेक्षा असल्याचे याचिकाकर्ते नगरसेवक दत्ता कावरे म्हणाले.