Cattle Slaughter Case Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Cattle Slaughter Case: जेऊर येथे कत्तलीसाठी डांबलेल्या सहा गोवंशीय जनावरांची सुटका

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकास ताब्यात, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेऊर (ता. जि. अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 6 गोवंशीय जनावरांची सुटका करून एकास ताब्यात घेतले. आरोपींकडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अबरार अमिन शेख (वय 57, रा. कसाबवाडा बायजाबाई, जेऊर अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलिस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहीद शेख, सुनील पवार, चालक भगवान धुळे यांचे पथक नेमून कारवाईसाठी रवाना केले.

पोलिस पथकास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहिल्यानगर ते संभाजीनगर रोडलगत जेऊर गावात एका हॉटेलच्या बाजूला शेतात पत्र्याच्या खोलीमध्ये एक व्यक्ती गोवंशीय जनावरांना कत्तल करण्यासाठी डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने संभाजीनगर रस्त्यावरील जेऊर गावात शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा घातला असता सहा जनावरांना डांबून ठेवल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून अबरार शेख यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक लाख 30 हजार रुपयांचे सहा गोवंशीय जनावरांची सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT