Illegal Liquor Raid Pudhari
अहिल्यानगर

Illegal Liquor Raid: १८ दिवसांत ७२ लाखांची अवैध दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

२७९ जणांविरोधात गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

नगर: पुणे जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या विषारी दारू हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक छापेमारी सुरू केली आहे.

गेल्या 18 दिवसांमध्ये 279 ठिकाणी छापे घालून 72 लाख 65 हजार 552 रुपयांची दारू जप्त केली. तर, 279 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत.

अहिल्यानगर काही वर्षांपूर्वी पांगरमाल विषारी दारू हत्याकांड घडले होते. त्यातही सुमारे 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच पद्धतीचे पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी विषारी दारूकांड घडले. त्यात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला.

त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू अड्डे आणि विषारी दारू वाहतूक व विक्री करणार्‍यांविरोधात कारवाईची धडक मोहीम सुरू केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 29 मे 16 जून 2026 या काळामध्ये जिल्ह्यात आठ पथकांशिवाय 2 विशेष पथके धाड सत्र सुरू केले. या पथकांनी अवघ्या 18 दिवसांत कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर दारू साठ्यावर आणि हातभट्ट्यांवर टाच आणली.

पथकाने 279 छापे घालून 258 जणांना अटक केली. त्यांच्याकडून देशी, विदेशी, गावठी, अलिशान वाहने असा सुमारे 72 लाख 65 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 279 गुन्हे दाखल केले आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे, प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व जवानांच्या पथकाने केली. जिल्ह्यात कुठेही अवैध दारू विक्री होत असल्यास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री, अवैध ताडीनिर्मिती आणि बनावट मद्याच्या विरोधात विभागाकडून ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. अवैध दारू विक्री करणार्‍यांची गय केली जाणार नाही.
-प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT