Ahilyanagar Green City Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Green City: पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेस प्रारंभ; शहरात एक लाख वृक्षारोपण करणार

येणाऱ्या काळात अहिल्यानगर शहर ग्रीन सिटी करण्याचा मानस असल्याचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

नगर: ऐतिहासिक अहिल्यानगर शहराला समृद्ध वारसा लाभला आहे. तोच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आमची धडपड आहे. प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि ऋतूचक्राचा बिघडलेला समतोल यावर एकमेव उपाय म्हणजे ‌’वृक्ष लागवड‌’.

त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी अभियान राबविण्याचा संकल्प केला असून, शहरात एक वर्षात एक लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. त्यात फळे, फुले आणि जास्ती जास्त ऑक्सिजन देणारी झाडे असतील. येणाऱ्या काळात अहिल्यानगर शहर ग्रीन सिटी करण्याचा मानस असल्याचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी सांगितले.

अहिल्यानगर महापालिका व साईद्वारका सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शहरात पर्यावरण दिनाचे (दि. 5) औचित्य साधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमहापौर ॲड.

धनंजय जाधव म्हणाले, राज्यात अनेक गावे आणि शहरे असे आहेत की, तिथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तिथे कोणत्याही ऋतूमध्ये गेल्यानंतर प्रसन्न वाटते. बारामती शहरात रस्त्याच्या दुतर्फा लावली झाडे आज प्रत्येकाला मोहून टाकतात म्हणून ग्रीन सिटी सारखा संकल्प आमच्या मनात आला.

दिवसेंदिवस शहरात नागरी वसाहती वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर रस्ते, पाणी या सुविधा दिल्या जातात. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहेत. शहरात नव्याने सिमेंट काँक्रिटचे रस्त्याचे जाळे उभे राहिले आहे.

येणाऱ्या काळात शहरात उष्णता व श्वासनाच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड महत्त्वाची वाटते. जेणे करून शहरात उष्णतेबरोबर ऑक्सिजनचाही प्रश्न निर्माण होणार नाही आणि शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडेल, असा विश्वास वाटतो.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी अभियान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन राबविण्यात आहे.

पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ते, ओपन स्पेस, शाळेची मैदाने येथे झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी 25 मे पासून प्रत्येक भागात खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजपासून अभियानास प्रारंभ होत असून, दररोज शंभर झाडे लावण्यात येणार आहेत. प्रभागातील प्रत्येक नगरसेवकांशी समन्वय साधून वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार

ग्रीस सिटी अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहे. महापालिकेत उपमहापौर पदाला प्रशासकीय कामकाज कमी असते. त्यामुळे प्रत्येक महापालिकेतील उपमहापौर यांनी देशाच्या भविष्यासाठी वृक्ष लागवड ही चळवळ राबवावी, अशी मागणी करणार असल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले.

शोभेची सुंदर वृक्ष ठरणार आकर्षण

शहरातून जाणाऱ्या मनमाड रस्त्यावरील पत्रकार चौक ते काटेज कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये मुंबई पुण्यासाठी शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल आणि देखभाल दुरूस्तीही करण्यात येईल. या रस्त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्याचबरोबर शहरात मोठे दोन पार्क उभारण्याचा मानस आहे, असे उपमहापौर ॲड. जाधव यांनी सांगितले.

भेट म्हणून वृक्षाची देवाण-घेवाण करावी

घराचा परिसर, शाळा-कॉलेजचे मैदान, सार्वजनिक खुल्या, ओपन स्पेस, रस्त्याच्या दुतर्फा परवानगी घेऊन झाडे लावण्यात येणार आहेत. आपल्या भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक कुटुंब एक झाड हा उपक्रम राबवून नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे. वाढदिवस, लग्न सोहळ्यात एकमेकांना वृक्ष भेट द्यावे आणि त्याची जोपासना करावी, असे आवाहन ॲड. जाधव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT