नगर: महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. सध्या कचरा संकलनाचे तीन तेरा वाजले असून सर्वत्र रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढीग दिसत आहेत.
घरोघरी घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांच्या घरी कचरा साठवून ठेवला जातो. त्याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नांतून प्रभाग 1 मधील कचर्याचे ढीग उचलण्यास सुरुवात करण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
भिस्तबाग महाल परिसरात रस्ता काँक्रीटीकरणाची व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, मात्र तेथेच कचर्याचे ढीग, मोकाट कुत्री पाहावयास मिळत आहेत. महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट आहे. महापालिकेने कचरा संकलन करण्याचे नियोजन करणे गरजेचे होते; मात्र त्यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.
येत्या आठ दिवसांमध्ये घंटागाडी व कचरा संकलन करण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास महापालिकेमध्ये कचरा टाकला जाईल, असा इशारा बारस्कर यांनी दिला. तसेच दुपारपर्यंत प्रभागातील कचरा उचलला गेला नाही तर पालिकेत आंदोलन केले जाईल, असा इशारा अधिकार्यांना फोनवरून दिला. त्यानंतर महापालिकेतर्फे प्रभागातील रस्त्याच्या कडेला साचलेले कचर्याचे ढीग उचलण्याचे काम सुरू केल्याचे बारस्कर यांनी सांगितले.
मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत
शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सर्रासपणे वावर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. शहरात रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचर्याच्या ढिगार्यांवर मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या पाहावयास मिळत आहे. ही हिंसक कुत्री हल्ला करत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केली आहे.