फुलोत्पादकांची मेहनत पाण्यात! फुले झाली बेरंगी; स्वप्ने कोमेजली  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar News: फुलोत्पादकांची मेहनत पाण्यात! फुले झाली बेरंगी; स्वप्ने कोमेजली

अतिवृष्टीने अकोळनेरची परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: नगरचे कास पठार म्हणून ओळख असलेल्या अकोळनेरला येथे उत्पादित होणाऱ्या नगरी फुलांचा सुगंध संपूर्ण देशात दरवळत असतो. परंतु चालू वर्षी अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची स्वप्न कोमेजली आहेत.

फुलशेतीला सोन्याची शेती म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवात बहरलेले फुलांचे मळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील, अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी सोनेरी स्वप्न देखील पाहिले होते. (Latest Ahilyanagar News)

परंतु गेल्या पंधरवड्यात कोसळलेल्या पावसामुळे फुल शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत. फुल उत्पादक शेतकऱ्यांची खूपच दयनीय अवस्था झाली असून विदारक चित्र पाहावयास मिळते. फुलउत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

गणेशोत्सवात अकोळनेर पट्ट्यात रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरलेले होते. झेंडू, शेवंती, गुलाबासह अस्टर, जरबेरा यांसारखी फुले फुलली होती. अतिवृष्टी व खराब हवामानामुळे फुलशेती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली, तरी नवीन वाणांचा प्रयोग व लागवडीत वाढ झाली आहे. मात्र, रोगराईमुळे फुलांचे नुकसान झाल्याने यंदा बाजारभावात तेजी राहण्याची शक्यता आहे.

नवरात्रौत्सव, दसरा व दिवाळीत सुगंधित फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू व शेवंती चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणाऱ्या अकोळनेर येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले होते. अकोळनेरसह कामरगाव, भोरवाडी, चास, तसेच पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा, हंगा या ठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन व कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून या भागात फुलशेती केली जाते.

गणेशोत्सवात झेंडू सरासरी 100 ते 120 रुपये किलो प्रमाणे विकला जात होता. आज दहा ते वीस रुपये किलो भाव मिळत आहे. शेवंती 250 रुपये किलो भाव होता. सद्यस्थितीत 70 ते 80 रुपये भाव मिळत आहे. जरबेरा 130 रुपये (दहा फुले गड्डी) आजमितीला चाळीस रुपये, गुलाब दोनशे रुपये किलो, तर अस्टर गणेशोत्सवात 200 ते 250 रुपये किलो दराने विकत होता. आज 30 रुपये किलो बाजार भाव मिळत आहे. गुलाब वगळता सर्वच फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. पॉलिहाऊस मधील फुले काही प्रमाणात चांगली राहिली आहे.

अकोळनेर गावातच जवळपास 250 एकरांवर शेवंती, तर 100 ते 150 एकरांवर झेंडू लागवड करण्यात आली आहे. शेवंतीत रतलाम, राजा, गोल्डन, पेपर व्हाईट, चांदणी, भाग्यश्री, पूजा व्हाईट, सानिया यलो, ऐश्वर्या, पोर्णिमा व्हाईट व यलो, सेंट व्हाईट, क्रिम व्हाईट यांसारखे शेवंतीचे प्रकार आहे. त्यांची लागवड करण्यात आली आहे. साधारण मार्चमध्ये शेवंतीची लागवड करण्यात येते. लागवडीत थोडी वाढ झाली आहे. तसेच, नवीन वाणांचा प्रयोग वाढल्याने फुलांच्या क्षेत्रात वाढ झाली, मात्र खराब हवामानामुळे फुलांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे.

झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जम्बो, मारी गोल्ड, गोल्ड स्पोट, अष्टगंधा, पितांबरी यांसारख्या व्हरायटी आहेत. तालुक्यातील फुलांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, नागपूर, मुंबई, बडोदा यांसारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी होत असते. परंतु सततच्या पावसाने फुल शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. फुलांनी ओलावा धरल्याने मार्केटमध्ये अशी फुले उतरवून घेतली जात नाहीत, तर शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने झाडे ही सडत आहेत. दसरा-दिवाळी, नवरात्रोत्सव या सणासुदीत भाव वाढणार असला तरी तालुक्यातील फुलांची गुणवत्ता व उत्पादन यामुळे शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

गुलछडी रोगांच्या विळख्यात!

अकोळनेर परिसरात जवळपास 200 एकरांवर गुलछडीची लागवड झाली. मात्र, अतिवृष्टीने गुलछडीवर ‌’मिक्स फ्लाय‌’ नावाच्या किटकांचा हल्ला झाला. त्यावर औषध नसल्याने 200 एकरांवरील गुलछडी रोगाच्या कचाट्यात सापडून नष्ट झाली आहे.

अतिवृष्टीमुळे फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची स्वप्ने कोमजली आहेत. मेहनतीने उभे केलेली शेती डोळ्यासमोर नष्ट होताना पाहणे ही फार मोठी वेदना आहे. फुले ही केवळ सजावटीची नाही, तर शेतकऱ्यांची आयुष्याची आशा आहे. त्यामुळे शासनाकडून लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.
-सचिन म्हस्के, शेतकरी, जेऊर
फुलशेती नाजूक असते. उत्पन्न मिळत असले तरी त्याला कष्ट ही खुप घ्यावे लागतात. मजुरांची देखील मोठी समस्या जाणवते. यंदा आसमानी संकटामुळे फुलशेतीची वाट लागली. फुले भिजली, भाव ही कोसळले. शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे .
-सचिन लाळगे, शेतकरी, अकोळनेर
फुल शेती ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. परंतु अतिवृष्टीमुळे खूपच नुकसान झाले आहे. एक एकर झेंडूची लागवड केली होती. साधारणपणे एकरी 70 हजार रुपये खर्च आला. परंतु पावसामुळे मोठे नुकसान झाले असून झालेला खर्च देखील वसूल होणार नाही.
-संतोष शेळके, फुलउत्पादक, अकोळनेर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT