जामखेड ः अंबड तालुक्यातील जामखेड येथील प्रभाकर उत्तमराव खरात यांनी त्यांच्या शेत गट नंबर 1036 मध्ये विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले.
जामखेड येथील प्रभाकर उत्तमराव खरात हे गुरुवारी सकाळी घरातून बाहेर गेल्यानंतर ते दिवसभर व रात्रीही घरी न आल्याने शुक्रवारी सकाळी पत्नी व नातेवाईकाने त्यांचा शोध घेतला. यावेळी ते त्यांच्या शेतातील गट नं. 1036 मध्ये झोपलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावातील नागरिक व नातेवाईकांनी शेतामध्ये धाव घेतली असता त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
खरात यांच्याकडे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड व खासगी कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली व अविवाहित दोन मुले असा मोठा परिवार आहे.