जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar: जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे व संग्राम जगताप यांची नावे चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

Ahilyanagar News: जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. तिसर्‍यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, भाजपच्या मोनिका राजळे व शिवाजी कर्डिले यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील 12 जागांपैकी 10 जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. त भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे व विक्रम पाचपुते असे चार उमेदवार विजयी झाले आहेत. या चार उमेदवारांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळण्यात जमा आहे.

उर्वरित तीन उमेदवारांपैकी राजळे या महिला असून, सलग तीनवेळा आमदार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्डिले हे माजी मंत्री असून, 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते जिल्हा बँकेचे चेअरमन देखील आहेत. त्यामुळे कर्डिले ऐवजी राजळे यांच्या नावाला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली आहे. या पक्षाचे आशुतोष काळे व डॉ. किरण लहामटे दुसर्‍यांदा तर काशिनाथ दाते हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. संग्राम जगताप हे ज्येष्ठ सदस्य आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गेल्या मंत्रिमंडळात देखील त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे मंत्रिपदासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने संग्राम जगताप यांच्याच नावाला पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.

जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ व नेवासा मतदारसंघातून विठठलराव लंघे विजयी झाले. हे दोन्ही आमदार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये होते. संगमनेर व नेवासा या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या. परंतु उमेदवारच उपलब्ध नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहमतीने खताळ व लंघे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. या दोन्ही जागी हे उमेदवार निवडून आले आहेत. हे दोन्ही आमदार पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदासाठी विचार होण्याची शक्यता धूसर आहे.

आगामी महायुतीच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे किंवा शिवाजी कर्डिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप या तीन जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT