Ahilyanagar District Bank Election Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या ५८९० संस्था सभासद; संगमनेर, कोपरगाव, नगरला सर्वाधिक मतदार संस्था

यंदाही या तीन तालुक्यातून किती संस्था सभासद असतील, यावरही बरेच काही अवलंबून असेल.

पुढारी वृत्तसेवा

नगर: दि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. प्रथमदर्शनी बँकेच्या सुमारे 5890 सभासद संस्था असून, सहकार विभागाकडून यातील पात्र संस्थांकडूनच ठराव मागाविण्यात आले आहेत.

दरम्यान, मागील आकडेवारीनुसार, सर्वाधिक सभासद संगमनेर, कोपरगाव आणि नगर तालुक्यात असल्याने निवडणुकीत हे मतदार निर्णायक ठरत आहेत. यंदाही या तीन तालुक्यातून किती संस्था सभासद असतील, यावरही बरेच काही अवलंबून असेल.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ठराव प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे आवश्यक सूचना करत आहेत.

जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या संस्थांना मतदानाचा अधिकार असतो. वि.का. सोसायटी मतदार संघातून 14 संचालक निवडून द्यायचे आहेत. सभासद यादी 2023 नुसार, बँकेकडे 1414 वि.का.सोसायट्या सभासद आहेत. यातील पात्र सोसायट्यांकडून ठराव मागाविण्यात आले आहेत.

संचालक मंडळाने त्यासाठी बैठक घ्यायची आहे. या बैठकीतून एका संचालकाच्या किंवा सभासदाच्या नावाने तो ठराव द्यायचा आहे. त्यासाठी तालुक्याचे सहायक निबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, अवसायानातील बंद संस्थांचे ठराव स्वीकारले जाणार नसल्याचे समजते.

शेतीपूरक मतदारसंघातून एक संचालक निवडून द्यायचा आहे. या मतदारसंघात 2137 संस्था सभासद आहेत. यात दुग्धोत्पादक संस्था 864, शेळीपालन व कुक्कुटपालन 120, मच्छिमार 53 अशा 1050 संस्थांचा समावेश आहे. मात्र, यातील 100 पेक्षा अधिक संस्था बंद आहेत. त्यामुळे उवर्रीत 950 पैकी ‘सभासद’ असलेल्या पात्र संस्थांचेच ठराव स्वीकारले जाणार आहेत.

बिगरशेती मतदार संघातून एक संचालक निवडून जाणार आहे. या ठिकाणी सहकारी बँका, पतसंस्था, मजूर संस्था इत्यादी अशा एकूण 2339 संस्था सभासद आहेत. यात मजूर संस्था 851 असल्या तरी साधारणतः 500 संस्था सभासद आहेत.

एकूणच, विकास सोसायटी, शेतीपूरक आणि बिगरशेती मतदार संघात एकूण 5890 सभासद संस्था आहेत. यातील बंद, अवसायानातील संस्था, प्रशासक असलेल्या संस्था, थकबाकीतील संस्था यांचे वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

त्यानंतर तालुकास्तरावरून प्राप्त होणाऱ्या ठरावांचीही छाननी होऊन, त्यानंतरच मतदारयादी तयार केली जाणार आहे. दि. 17 जुलैनंतरच अंतिम आकडेवारी पुढे येणार असली तरी यातून 500 पेक्षा अधिक संस्था मतदानासाठी अपात्र ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘त्या’ पाच जागांसाठीही मतदानाचा अधिकार

प्रत्येक तालुक्यातील वि.का. सभासद संस्था त्या त्या तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांना मतदान करणार आहेत. तर वि.का. संस्था, शेतीपूरक, बिगरशेती या तीन मतदारसंघातील एकूण मतदार संस्था दोन महिला प्रतिनिधी, एक ओबीसी, एक अनुसूचित जाती-जमाती, एक भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या पाच संचालकांना मतदान करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT