Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: शिंदे-विखे-थोरातांची बैठक तोडग्याविना

पालकमंत्री विखे पाटील आज करणार उमेदवारांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नगरः अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडमूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने मंगळवारी (दि २०) पहिल्यांदाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात एकत्र आले. या तिघांची प्रदीर्घ बैठक झाल्यानंतर त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.

या तिघा नेत्यांनी इच्छुकांचे रुसवेफुगवे काढत बँक निवडणूक बिनविरोधाचा प्रयत्न केला, मात्र उशिरापर्यंत त्यात तोडगा निघाला नाही. अखेर आज बुधवारी माघारीच्या काही क्षण अगोदर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उमेदवारांची नावे जाहीर करतील, असा निर्णय घेण्यात आला.

सभापती राम शिंदे, मंत्री विखे व बाळासाहेब थोरात यांचा शासकीय विश्रामगृहावर तब्बल दहा तास चर्चेचा काथ्याकूट चालला. या तिघांनी एकत्रितपणे सर्वपक्षीय इच्छुकांशी चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली. काहींचा रुसवाफुगवा काढण्याचा, तर कुठे कट्टर विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला.

आता ही बैठक किती यशस्वी झाली, हे बुधवारी दुपारी तीन वाजताच समजणार आहे. दरम्यान, सर्वपक्षीय बैठक सकारात्मक झाली असून, मंत्री विखे पाटील आज बुधवारी सकाळी ११ वाजता अधिकृत उमेदवारांची घोषणा करणार आहेत.

ज्यांची यादीत नावे नसतील, त्यांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी केले. जिल्हा बँकेच्या चार जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना, उर्वरित १७जागांसाठी अजूनही दोनशेपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आहेत. बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.

सभापती शिंदे, मंत्री विखे, माजी मंत्री थोरात यांच्यासह खा. नीलेश लंके, माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनीका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. अक्षय कर्डिले, आ. प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, आ. विवेक कोल्हे, आ. काशीनाथ दाते, आ. किरण लहामटे, आ. हेमंत ओगले, वैभव पिचड, सीताराम गायकर, भानुदास मुरकुटे, सुजीत झावरे, करण ससाणे, सत्यजीत कदम, हर्षदा काकडे, सीताराम काकडे हे प्रमुख नेते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT