शशिकांत पवार
नगर तालुका: पूर्वीच्या काळी सायकल हे सर्व सामान्यांचे मुख्य दळणवळणाचे साधन होते. शाळेतील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी सर्वांसाठी सायकल म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग होता. 1980-90 च्या दशकापर्यंत दळणवळणासाठी सायकल हेच मुख्य साधन होते. परंतु काळानुरूप बदल होत गेले अन् सायकलची जागा दुचाकी, चारचाकी वाहनांनी घेतली. एसटी बस, जीप यांचा वापर वाढला. रस्त्यांचे जाळे वाढले अन् सायकलचा वापर हळूहळू कमी होत गेला. परंतु आता परत फिरून आरोग्यासाठी तरुणांपासून वृद्धांपर्यंत सायकलिंगचा प्रकार वाढत चालला आहे. एकंदरीत काळ बदलला तरी सायकलने आपले महत्त्व अबाधित ठेवले आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागात घरोघरी सर्रासपणे दळणवळणासाठी सायकल हे मुख्य साधन बनलेले होते. 1980-90 च्या दशकात घरी सायकल असणे प्रतिष्ठेचे समजले जात होते. अनेक शेतकऱ्यांकडे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल देखील घेणे शक्य होत नव्हती. त्यामुळे गावोगावी, शहरांमध्ये भाडोत्री सायकल मिळत असे. भाडोत्री सायकल घेऊन चिमुकले सायकल चालवण्यास शिकण्यासाठी कसरत करतानाचे चित्र पाहावयास मिळत असे.
शेतीमाल बाजारात नेण्यासाठी बैलगाडी, तसेच सायकल हा एकमेव पर्याय उपलब्ध असत. गावामध्ये चारचाकी वाहने पाहिला सुद्धा मिळत नव्हते. अशावेळी दळणवळणाची सर्व जबाबदारी सायकलच पार पाडत असे. कित्येक किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला जाई. परंतु काळानुरुप सायकल मागे पडत तिची जागा दुचाकी, चारचाकी वाहनांनी घेतली. सायकलची जागा वाहनांनी घेतल्यानंतर वेळेची बचत झाली. परंतु अनेक दुष्परिणामही पाहावयास मिळत आहेत.
अठराव्या-एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये सायकलचा प्रारंभ झाला. भारतात ब्रिटिश काळात सायकलचा वापर वाढला. स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागात सायकल हे सर्वाधिक वापरले जाणारे साधन ठरले. स्वस्त व परवडणारे साधन म्हणून सायकलकडे पाहिले जात असे. प्रदूषणमुक्त तसेच ध्वनिप्रदूषणही होत नव्हते. हवामान बदलाच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून देखील सायकल फायदेशीर ठरत होती. आरोग्य, पर्यावरण आणि साधेपणाची जीवनशैली म्हणून एकेकाळी सायकल खूप भाव खाऊन गेली.
सायकल चालवणे आरोग्यासाठी फायदेशीर! सायकल चालवणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वाढते आजार, लठ्ठपणा, मधुमेह यामुळे नागरिकांना व्यायामाचे महत्त्व पटू लागले आहे. सकाळ संध्याकाळ सायकल चालवणारे युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक पुन्हा दिसू लागले आहेत. सायकलिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहते. मन प्रसन्न होते. औषधांवरील खर्च कमी होतो.डॉ. योगेश कर्डिले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर
सायकलचा वापर कमी झाला अन् नागरिकांनाही विविध व्याधींनी ग्रासले गेले. आरोग्याच्या दृष्टिने सायकल चालविण्याचे विविध फायदे होत असतात. त्यामुळे प्रतिष्ठित लक्झरीयस गाड्यांमधून प्रवास करणारे नागरिकही व्यायाम म्हणून सायकल चालवत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. वाढते प्रदूषण.. आरोग्याच्या समस्या अन् इंधनाचे वाढते दर पाहता पुन्हा सायकलचे दिवस येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
हृदय, तसेच फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. उच्च रक्तदाब, मधुमेह, पाय, कंबर व गुडघे मजबूत होतात. मानसिक तणाव कमी होऊन झोप सुधारते. त्यामुळे सायकल चालवणे हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर आहे. सायकलचा वापर वाढावा यासाठी विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना, मुलींच्या शिक्षणासाठी सायकल प्रोत्साहन, आरोग्य व पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅली अशा विविध योजना शासनाच्या वतीने राबविल्या जातात.डॉ. विनोद काकडे, तालुका आरोग्य अधिकारी