नगर: कोतवाली पोलिसांनी गंभीर गुन्ह्यात शामिल असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मात्र, तपासात आरोपी सराईत दुचाकी चोर निघाला. त्याने घराजवळच पाच दुचाकी लपविल्या होत्या. पोलिसांनी त्या दुचाकी हस्तगत केल्या.
किशोर पठारे (रा. पिंपळगाव माळवी, ता. जि. अहिल्यानगर, हल्ली रा. वडगाव गुप्ता, ता. जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहेत. आरोपी किशोर पठारे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, धमकी अशा कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात कोतवाली पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आरोपीच्या शोध घेण्यााबत पोलिस पथकाला सूचना केल्या होत्या. पोलिस पथकाला 11 मार्च 2025 रोजी आरोपी किशोर पठारे मिळाला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन पोलिस निरीक्षकांसमोर हजर केले. पोलिस तपासात आरोपी हा रेकॉर्डवरील दुचाकी चोर असल्याचे समोर आले.
त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात असलेल्या दुचाकी चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू केला. त्याने अहिल्यानगर शहर व आजुबाजुच्या परिसरातून चोरी केलेल्या दुचाकी घराजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिस पथकाने त्याच्या घराजवळ जावून तीन लाख 70 हजारांच्या चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या दुचाकीबाबत कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.