आठ महिन्यांत 29 सशस्त्र दरोडे Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime Rate: आठ महिन्यांत 29 सशस्त्र दरोडे; अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

गुन्हे कमी होण्याऐवजी वाढ; एसपी सोमनाथ घार्गे यांच्या कारवाईमुळे 29 पैकी सर्व दरोडे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

अहिल्यानगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापुरुषांच्या विटंबना, यातून वाढणारे जातीय तणाव, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसले आहे. याशिवाय जिल्ह्यात गावठी कट्टेही उदंड झाले आहेत, यातून टोळी युद्ध, खून अशा गंभीर घटनाही समोर आलेल्या आहेत. यातील सशस्त्र दरोडेही चिंता वाढविणारे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरोडेही वाढलेले आहे. गेल्या वर्षी 24 दरोडे पडले होते, तर या आठ महिन्यांतच 29 दरोड्याच्या घटना घडल्याचे पुढे आले आहे.(Latest Ahilyanagar News)

जिल्ह्यात 32 पोलिस ठाणी आहेत. गेल्या वर्षी अर्थात 2024 मध्ये वर्षभरात 24 सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व घटनांमध्ये दरोडेखोरांनी सुमारे 46 लाख रुपयांचा मुद्देमाल पळवला होता. तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाची चक्रे फिरवली. त्यामुळेच सर्वच्या सर्व 24 गुन्ह्यातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचे दिसले. या गुन्ह्यांमध्ये 143 दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 42 लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता.

दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी गुन्हे कमी होण्याऐवजी त्यात वाढ झालेलीच दिसत आहे. सन 2025 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 29 सशस्त्र दरोडे पडले आहेत. यात 80 लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला आहे. या गुन्ह्यांचाही स्थानिक गुन्हे शाखेने चांगला तपास केला होता. त्यामुळेच 29 पैकी 29 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसले. संबंधित 28 दरोड्यांच्या गुन्ह्यात पोलिसांनी 118 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 55 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, एसपी घार्गे यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारीविरोधात विशेष मोहीम राबवल्याचे दिसले.

..तर अहिल्यानगरमध्ये दंगल घडली असती?

जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. कोठला परिसरातील घटनेनंतर शहरात जातीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, घार्गे यांनी अतिशय सावधपणे व काही कठोर निर्णय घेऊन हे प्रकरण हाताळल्याचे दिसले. त्यामुळे राज्याचे लक्ष लागलेले अहिल्यानगर पुन्हा शांत झाल्याचे दिसले. याशिवाय दोन दिवसांपूर्वी पुन्हा महापुरुषांचे आक्षेपार्ह लिखाण असलेला कागद सापडल्याने तणाव वाढला होता. मात्र, येथेही एसपींनी काही तासात आरोपी जेरबंद करून संघटनांना शांततेचे आवाहन केल्याचे दिसले. त्यामुळे एसपी घार्गे हे अहिल्यानगरमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT