Ahilyanagar Bhistbagh Mahal Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Bhistbagh Mahal: भिस्तबाग महालाचा बदलणार लूक; सुशोभीकरणाला वेग

पर्यटन विकासातून दीड कोटींचा निधी; सावेडी परिसरात जॉगिंग ट्रॅक व हरित विकास योजना

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: सावेडी उपनगरातील ऐतिहासिक भिस्तबाग महालाचा बाहेरील लूक बदलणार आहे. महालाच्या चहूबाजूंनी दगडी भिंत, काँक्रीटचे रस्ते आणि झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूभोवती वास्तूकलेचा नमुना साकारत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे व भव्यतेमुळे ही वास्तू सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून, वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले जात आहे.

अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून नव्याने वसाहती निर्माण होत आहेत. त्यात सावेडी उपनगरातील प्रभाग एकमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती निर्माण होत असून, रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईनची मागणी होत आहे. तसेच, ओपन स्पेस सुशोभीकरणाकडे ही नागरिकांचा ओढा आहे. नागरिकांनी मागणी लक्षात घेऊन आमदार संग्राम जगताप व नगरसेवक संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक भिस्तबाग महालाभोवती दगडी वास्तूकलेचा नमुना उभा राहत आहे.

त्यासाठी आमदार जगताप यांनी प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडून दीड कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या वास्तूमध्ये आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. केवळ काँक्रीटची इमारत न राहता, सौंदर्याचे निकष पाळून तिची मांडणी करण्यात आली आहे. दगडी भिंत, सिमेंट काँक्रिटचे रस्ते व झाडे लावणे, छोटे बुरूज उभारणे या कामांचा त्यात समावेश आहे. त्यात सिमेंट रस्ते आणि दगडी भिंतीचे काम सध्या सुरू आहे. येत्या काही दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर परिसराची शोभा वाढणार आहे.

नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक

प्रभाग एकमधील नंदनवन नगर, पवन नगर, कसबे वस्ती, अहिल्यानगरी, बारस्करनगर, ढवणवस्ती, तपोवन रोड भागातील नागरिकांसाठी सुसज्ज जॉगिंग ट्रॅक उपलब्ध होणार आहे. तसेच, नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे गार्डन मिळणार आहे.

तपोवन रस्त्याला मार्केट

नगर-मनमाड आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर रस्त्याला जोडणाऱ्या पाईपलाईन रस्ता, गुलमोहर रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून तपोवन रस्त्याकडे पाहिले जाते. राजवीर चौकापासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर भिस्तबाग महालाभोवती वास्तू आकार घेत आहे. त्यामुळे तपोवन रस्त्याचे ‌‘मार्केट‌’ वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकासमधून भिस्तबाग महालाभोवती सुशोभीकरणासाठी दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून काँक्रीटचा रस्ता, दगडी भिंत व वृक्षारोपणाचे काम करण्यात येणार आहे. या वास्तूने अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
संपत बारस्कर, नगरसेवक
प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून भिस्तबाग महालाभोवती सुशोभीकरण करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होईल. तशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.
मनोज पारखे, शहर अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT