नगर: अहिल्यानगरमधून राजस्थान मारवाड जंक्शन, अजमेर या ठिकाणी जाणार्या येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या मार्गावर रेल्वे सुरू करण्याबाबत खा. नीलेश लंकेंकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी निवेदन देत मागणी केली आहे.
खा. लंके नुकतेच पावसाळी संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी रेल्वे स्टेशन येथे त्यांची शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेत खा. लंके यांचे काळे यांनी या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, प्रदेश पदाधिकारी प्रा. सिताराम काकडे, कामगार सेनेचे नेते विलास उबाळे, माजी नगरसेवक योगीराज गाडे, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, महावीर मुथा, अल्पसंख्यांक काँग्रेस आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
निवेदनात काळे यांनी म्हटले आहे, अहिल्यानगर शहरामध्ये जैन, मारवाडी बांधवांची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळेच नगरला मिनी मारवाड म्हटले जाते. राजस्थानमध्ये अनेकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने अनेक कुटुंब दर्शना करिता राजस्थानकडे जात असतात. शहरात राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे.
देशाच्या सर्व भागातून जैन बांधव समाधी स्थळी भेट देण्यासाठी येत असतात. त्यामध्ये राजस्थानातून येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. शहरामध्ये मुस्लिम बांधवांची देखील मोठी संख्या आहे. अजमेरच्या दर्ग्या समोर नतमस्तक होण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने दरवर्षी जात असतात. मात्र या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही. त्यामुळे जाणार्या - येणार्या प्रवाशांची गैरसोय होते.
ती दूर होण्याकरिता नगरहून राजस्थानकडे मारवाड, अजमेर या ठिकाणांकडे जाण्याकरिता आठवड्यातून किमान एक ते दोन रेल्वे सुरू करण्याबाबत अधिवेशन काळात केंद्रीय रेल्वे मंत्री, भारत सरकारकडे मतदारसंघाचे खासदार म्हणून मागणी करावी, असे काळे म्हणाले.
प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करावा
नगर - पुणे इंटरसिटी रेल्वेची गेल्या अनेक वर्षांपासूनची नगरकरांची मागणी आहे. ठाकरे शिवसेना यासाठी आग्रही आहे. खा.लंकेंनी याबाबत संसदेमध्ये आवाज उठविल्यामुळे नगरकरांची स्वप्नपूर्ती आता दृष्टीक्षेपात आली आहे.
त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्षात लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टीने गती मिळण्याकरिता पुन्हा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी यावेळी शहरप्रमुख काळे यांनी मागणी केली आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल शहर शिवसेनेच्या वतीने खा.लंकेंचा सत्कार करत नगरकरांच्या वतीने काळे यांनी आभार मानले.