नगर: स्मशानभूमी सुशोभिकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तक्रारदाराकडून साडेसहा हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन सुरेश दिनकर (वय 41, रा. अहिल्यानगर) असे त्या प्रभारी उपअभियंत्याचे नाव आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक अजित त्रिकुटे फिर्याद दिली. तक्रारदार शासकीय ठेकेदार असून, त्यांनी देहरे येथील दत्त मंदिर स्मशानभूमी सुशोभीकरणाचे 8 लाख 22 हजार 206 रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंता सचिन दिनकर याने एकूण बिलाच्या 2 टक्के म्हणजेच 16 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 10,000 रुपये तक्रारदाराने यापूर्वीच दिले होते. उर्वरित 6 हजार 500 रुपयांसाठी दिनकर याने वारंवार तगादा लावला होता. पैसे दिल्याशिवाय बिल पुढे पाठवणार नाही, अशी भूमिका त्याने घेतल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. 23 मार्च रोजी सायंकाळी दिल्ली गेट आणि न्यू ला कॉलेज समोर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी सचिन सुरेश दिनकर याने तक्रारदाराकडून उर्वरित लाचेची रक्कम 6,500 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तक्रारदाराने पैसे देण्याचा प्रयत्न केला असता दिनकर याला एसीबीच्या कारवाईचा संशय आला.
त्याने तेथून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब पथकाच्या लक्षात येताच पथकाने त्याला पाठलाग करून पंचासमक्ष पकडले. स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवल्याबद्दल दिनकर याला ताब्यात घेण्यात आले. ही कावाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिकुटे, पोलिस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारूण बेग यांचा समावेश होता.
कनिष्ठ अभियंता बड्या नेत्याचा भाऊ
लाचेच्या जाळ्यात अडकलेला जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता सचिन दिनकर जिल्ह्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा भाऊ आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनात दिवसभर चर्चा सुरू होती.