बेलापूर : फत्याबाद येथील दोघा महिलांवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना होऊन महिना उलटत आला तरी अद्याप हल्लोखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे संबंधित महिलांसह त्यांचे कुटुंब दहशतीखाली असल्याचे चित्र आहे.
याबाबतची माहिती अशी, फत्त्याबादचे माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांच्या घरी रविवारी (दि.20) एप्रिल 2025 रोजी पहाटे धाडसी दरोड्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी घरात दरोडेखोरांना पाहताच त्यांची सून हर्षदा यांनी आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर दागिने असलेले गाठोडे खाली फेकून गच्चीवरून उड्या मारून पळून गेले होते. हि घटना ताजी असताना दुसर्या दिवशीच आठरे यांची सून हर्षदा व पुतणीसोबत आपल्या मुलीला दवाखान्यातून घरी घेऊन येत होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्या दोघींच्या अंगावर अॅसिड फेकले. या गंभीर घटनेत त्या दोघी जखमी झाल्या. लोणी उपचारासाठी नेण्यात आले होते. याबाबत गंभीर घटनेतील आरोपींचा अद्याप कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. यामुळे पोलीसाच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाले.
या गंभीर घटनेला पंधरा दिवसांहून अवधी उलटून देखील पोलिसांनी कोणतीही अशी ठोस दखल घटनेची घेतलेली दिसत नाही. आरोपीचा शोध न लागल्यास गावातील असंख्य महिलांचा मोर्चा लोणी पोलिस ठाण्यावर नेऊ, असा संतप्त इशारा हर्षदा आठरे यांनी दिला.
रसायन हल्ल्यातील नमुने नाशिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे. त्यांचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे हे रसायनच होते का, जर होते तर ते आरोपींनी कोठून आणले, ते मग्ग्यात की बाटलीत आणलेले होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे.