बोधेगाव: तालुक्यातील शहर टाकळी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा खातेदारांनी दिला आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शहरटाकळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून 2 ते 3 कर्मचारी वर्गावर बँकेचे कामकाज चालू असल्यामुळे या शाखेमध्ये कुठलेही काम वेळेवर होत नाही. सुशिक्षित बेरोजगार व शेतकर्यांना पीककर्ज शासनाच्या नियमाप्रमाणे वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्येसारखे प्रकार वाढले आहेत. (Latest Ahilyanagar News)
शाखाधिकारी वेळेचे कारण सांगून नेहमी उडवाउडवीची उत्तरे देतात. दिव्यांगांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. व्यावसायिकांना कर्ज दिले जात नाही. विद्यार्थ्यांचे खाते वेळेत होत नसल्याने विद्यार्थी व पालकांना ताटकळत बसावे लागते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शाखेत व्यवहार ठप्प होतात.
याकडे शाखाधिकारी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी दुर्लक्ष केले जाते, तसेच कर्मचारी वेळेवर येत नाही. अशा कर्मचार्यावर सीसीटीव्ही फुटेज बघून तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, अशा तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.
बँकेचा कारभार आठ दिवसांमध्ये सुरळीत झाला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच उषाताई बबनराव मडके, जितेंद्र गांधी, अनिल मडके, रासपचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, भाऊसाहेब मडके पाटील, राजेंद्र चव्हाण, तालुका उपाध्यक्ष देविदास चव्हाण, पंढरीनाथ कोल्हे, अनिता इंगळे, नामदेव गादे आदींनी दिला आहे.