देवठाण: अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण आज तुडुंब भरले असून वार्याच्या लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती अकोले उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर यांनी दिली.
एकंदर 1060 दलघफू क्षमता असलेले हे धरण चालू वर्षी जून अखेरीस भरल्यामुळे शेतकरी बांधव समाधानी आहेत. (Latest Ahilyanagar News)
या पाण्यामुळे आता रब्बी पिक व पिण्याचे पाण्याची व्यवस्था झाली आहे. अकोले तालुक्यातील देवठाण विरगाव हिवरगाव डोंगरगाव पिंपळगाव व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ जवळेकडलग, पिंपळगावकोंझिरा, वडगावलांडगा, चिकणी राजापूर निमगाव, चिखली ही आठ, गावे व सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा या 16 गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते, याशिवाय अनेक गावांना पिण्यासाठीही या धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे होते.