‘संजय गांधी’ व ‘श्रावण बाळ’साठी आधार अपडेट सक्तीचे  File Photo
अहिल्यानगर

‘संजय गांधी’ व ‘श्रावण बाळ’साठी आधार अपडेट सक्तीचे!

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आदेश; लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर मिळणार पैसे

पुढारी वृत्तसेवा

निराधार व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र थेट ‘डीबीटी’ मार्फत या निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्यासाठी आधारकार्ड अपडेट करून मोबाइल क्रमांक बँक खात्याला लिंक करावा लागणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यभर सुरू करण्यात आली असून नगर जिल्ह्यात देखील हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची डेडलाईन ठेवण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यासह विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता; तसेच वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत फेर्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचार्यांची कसरतही थांबणार आहे. सरकारच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निराधार व्यक्तींना आता कागदपत्रे अपडेट करून घ्यावी लागतील. बहुतेक व्यक्तींना आधारकार्ड, बँक खात्याला मोबाइल क्रमांक लिंक करावा लागेल. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात 85 टक्के काम

नगर जिल्ह्यात या योजनेत आधार अपडेटचे काम 85 टक्के झालेले आहे. यात नगर, कोपरगाव, श्रीरामपूर जिल्ह्याचे काम 100 टक्के झालेले आहे. राहुरी, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, अकोला, संगमनेर आणि राहाता तालुके 90 टक्क्यांच्या पुढे आहे. पारनेर तालुका या कामात सर्वात तळाला असून याठिकाणी 63 टक्के काम झालेले आहे. नेवासा, शेवगाव आणि नगर तालुके देखील 80 टक्क्यांच्या आत असून कर्जत तालुका 90 टक्क्यांच्या टप्प्यात आहे. जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेत 1 लाख 45 हजार 151 लाभार्थी असून 1 लाख 24 हजार 58 लोकांचे आधार अपडेट झालेले आहेत.

केंद्र पुरस्करकृत योजनेत राज्यात नंबर वन!

केंद्र सरकारच्यावतीने दारिद्रय रेषेखाली असणार्या लोकांसाठी राबवण्यात येणार्या योजनाची मदत ऑनलाईन डिबीटीच्या माध्यमातून राबवण्यात नगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.विशेष सहाय्य योजनेत राज्यात 19 डिसेंबर अखेर संजय गांधी व श्रावण बाळ योजनेत 27 लाख 15 हजार 796 लाभार्थ्याचे आधार अपडेट झालेले असून त्यांना डीबीटी मार्फत अर्थसहायक करण्यात येणार आहे.

सामाजिक अर्थसहाय योजनेत लाभार्थी यांना वर्षातून एकदा हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी सदरील प्रमाणपत्र तयार करणे ते तहसील कार्यालय यांना जमा करणे याबाबतची कार्यवाही स्वत: लाभार्थी यांना करावी लागते. लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण होताच ‘जीवन प्रमाणाम’ योजना राबविण्याचा मानस आहे.
-अतुल चोरमारे, उपजिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT