सरकार कोणाचेही असो नाक दाबले तर तोंड उघडले पाहिजे, असे मजबूत संघटन निर्माण झाले पाहिजे. संघटन मजबूत करायचे असेल तर कार्यकर्त्याचे चारित्र्य शुद्ध असावे, जीवन निष्कलंक असावे, जीवनात त्याग असावा, अपमान सहन करण्याची ताकद असावी, आचार विचार शुद्ध असावे तर कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन येते आणि लोक आपले ऐकतात, असे मत पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिध्दी (ता.पारनेर) येथे लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.
लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ता बैठकीसाठी राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते राळेगणसिद्धी येथे उपस्थित होते. न्यासाच्या कार्याध्यक्षा कल्पना इनामदार, सचिव अशोक सब्बन, खजिनदार दत्ता आवारी, विश्वस्त दगडू मापारी, लक्ष्मण मापारी, अन्सार शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी संघटन बांधणीबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली. आलेल्या प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. बैठकीमध्ये जिल्हास्तरावरील, आणि तालुकास्तरावरील समित्यांबाबत चर्चा होऊन जिल्हाध्यक्ष पद निवडीबाबत सूचना मांडली. जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात यावे, हा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी विकास गाजरे, रामदास सातकर, मनोज मुठे, गोविंद नलगे आदींनी यांनी सहकार्य केले.
जन आंदोलनामुळे देशाला आणि राज्याला माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, ग्रामरक्षक दल, जन लोकपाल कायदा, यांसारखे दहा कायदे जनतेला मिळाले, असेही यावेळी डॉ. हजारे यांनी आवर्जून सांगितले.