114 वा श्रीरामनवमी उत्सव pudhari
अहिल्यानगर

श्रीरामनवमी उत्सवातील सजावटीसाठी सौदीतील भक्ताची देणगी

रामनवमी उत्सवासाठी पावणेदोन लाख भक्तांना निमंत्रण; 87 पालख्यांची नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी : शिर्डीत 114 वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या उत्सवासाठी जगभरातील पावणेदोन लाख साईभक्तांना साईबाबा संस्थानाने निमंत्रण पाठविले आहे. 5 ते 7 एप्रिल दरम्यान होणार्‍या उत्सवाकरिता मुंबईतील साईभक्तांच्या देणगीतून विद्युत रोषणाई, तर सौदी अरेबियातील भक्ताच्या देणगीतून फुलांची सजावट केली जाणार आहे. उत्सवासाठी 87 पालख्यांची नोंदणी संस्थानाकडे झाली आहे.

शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवाचे यंदा 114 वर्षे आहेे. श्री साईबाबा संस्थानाने 1 लाख 73 हजार 34 भक्तमंडळ, सभासदांना उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पाठविल्या आहेत. मुंबईतील द्वारकामाई मंडळातर्फे 4 नंबर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस श्री गजमुख गणपतीचा भव्य काल्पनिक देखावा उभारण्यात येत आहे. मुंबईचे साईभक्त कपिल चढ्ढा यांनीविद्युत रोषणाईसाठी, सौदी अरेबियातील साईभक्त व्यंकटा सुब्रमण्यन यांनी फुलांची सजावट करण्यासाठी देणगी दिली आहे. उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

उत्सवानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी, तसेच उन्हापासून संरक्षणाकरिता मंदिर परिसरात सुमारे 67 हजार 409 चौरस फूट जागेवर मंडप उभारण्यात आले आहेत.

अतिरिक्त निवासासाठी साईबाबा भक्त निवासस्थान (500 रूम), साईधर्मशाळा येथे सुमारे 38 हजार 790 चौरस फूट निवासी कापडी मंडप उभारणी करण्यात आली आहे. तेथे विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह व सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबई व परिसरातून पालखीसोबत येणार्‍या पदयात्रींच्या निवार्‍यासाठी मुंबई ते शिर्डी महामार्गावरील पालखी थांब्याच्या ठिकाणी सुमारे 1 लाख 17 हजार चौरस फूट कापडी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. पालखीतील साईभक्तांसाठी यंदा प्रथमच थांब्याच्या ठिकाणी भजन व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पालखीतील साईभक्तांच्या व्यवस्थेकरिता मोबाईल टॉयलेट व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी पदयात्रा प्रवासाकरिता कोपरगाव येथील वाल्मीकराव कातकडे यांनी विनामूल्य 10 पाण्याचे टँकर चालकासह दिले आहेत.

पदयात्रींची शिर्डीतील साई धर्मशाळेत नाममात्र दरात निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. संस्थान रुग्णालयाचे फिरते वैद्यकीय पथक तैनात असेल. श्री साईप्रसादालयात अंदाजे दोन लाखांहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन करतील, असा अंदाज बांधत नियोजन करण्यात आले आहे. या काळात भाविकांना तीन दिवस वेगवेगळे मिष्ठान्न प्रसाद भोजनात देण्यात येणार आहे. गुरुस्थान मंदिरासमोर दीक्षित वाडा, नवीन दर्शनरांग, शांतीनिवास इमारत दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, श्री साईआश्रम (1000 रूम) व श्री साईप्रसादालय येथे प्रथमोपचार केंद्र असतील. श्रींच्या दर्शनासाठी ये-जा करण्यासाठी श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, श्री साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय येथून संस्थानच्या जादा बस असतील. मंदिर परिसरात संस्थान सुरक्षा कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, शीघ्र कृती दल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT