Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar : दिल्लीला जाणारे सव्वा कोटीचे स्क्रॅप; एमआयडीसीमध्ये पकडले

एक कोटी 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर : पुण्यावरून दिल्लीकडे तांबे व ऍ़ल्युनिमीअम स्क्रॅप घेऊन जाणारा कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागापूर एमआयडीसी जवळ चालकासह पकडला. आरोपीकडून सुमारे एक कोटी 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शैलेंद्र सोरन सिंह (वय 45, रा. खड्डा कॉलनी, स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तर, ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज अग्रवाल (रा.पुणे), एच. एस. ट्रेडींग कंपनी, सद्यंकुप्पम, बब्बू (पुर्ण नाव माहिती नाही) व बब्बू याचा मित्र यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने आहेर यांनी पोलिस अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ व प्रशांत राठोड यांचे पथक नेमून शोध घेऊन कारवाईसाठी रवाना केले.

पोलिस पथकास 13 फेब्रुवारी 2025 रोजी माहिती मिळाली की, एक कंटेनर अवैधरित्या तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल पुणे येथून दिल्लीकडे जात आहे. तो सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे थांबला आहे, असे समजले. त्यानुसार पोलिस पथकाने एमआयडीसीत जावून कंटेनर चालकास ताब्यात घेतले. त्याने शैलेंद्र सिंह असे नाव सांगितले. त्याच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता तो दिशाभूल करणारी माहिती सांगू लागला. पथकाने कंटेनरची पाहणी केली असता त्यात तांब्याचे पाईपचे बंडल, तांब्याचे जुने भांडे, तांब्याची तार, ऍ़ल्युमिनीअमची भंगार मिळून आले. कंटेनर चालकाने मालाची पावती दाखविली.

मुद्देमालाबाबत बिल्टी व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल यामध्ये तफावत दिसून आल्याने कंटनेर चालक शैलेंद्र सिंह याला ताब्यात घेतले. कंटेनर व तांबे व ऍ़ल्युमिनीअम धातूचे भंगार माल असा एकूण एक कोटी 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शैलेंद्र सिंह याच्याकडे विचारपूस केली वरील माल ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज अग्रवाल (रा.पुणे) यांच्या सांगण्यावरून पुरवठादार एच. एस. ट्रेडींग कंपनी, सदयंकुप्पम, तामिळनाडू यांच्याकडील व मालापैकी तांब्याचे पाईपचे बंडल बब्बू व त्याच्या मित्राने वाघोली (जि. पुणे) येथून कंटेनरमध्ये भरून दिले. तो माल दिल्ली येथे पोहोच करावयाचा आहे, असे सांगितले. त्यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंटेनर चालकास तपासाकामी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT