तुफानी पावसाने धबधब्यांचे नयनरम्य दृश्य  pudhari
अहिल्यानगर

Pathardi News: पावसाने करंजी घाटात धबधब्यांचे नयनरम्य दृश्य

शेतकर्‍यांचे नुकसान, वाहतुकीला अडथळा

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुका : तालुक्यात शनिवार (दि. 24) व रविवार (दि. 26) या दोन दिवसांत अनुक्रमे 34.80 आणि 42.30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या जोरदार पावसाने रविवारी करंजी घाटात तुफानी पावसाने धबधब्यांचे नयनरम्य दृश्य निर्माण झाले.

या दोन दिवस झालेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकर्‍यांसह नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मे महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने करंजी घाटात धबधबे डोंगरावरून कोसळत होते, तर पाण्याची पातळी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रविवारी करंजी घाटात तुफानी पावसाने धबधब्यांचे नयनरम्य दृश्य निर्माण झाले. काही प्रवाशांनी या निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला, परंतु पावसामुळे रस्त्यावर पाणी, माती आणि दगड येऊन वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. तालुक्यातील नदी, नाले, बंधारे आणि ओढ्यांना पाणी आल्याने शेतीसाठी फायदा झाला असला, तरी मोहज खुर्द, माणिकदौंडी परिसरात घरांचे व सोलरचे नुकसान झाले. पावसामुळे शेतातील माती खरडून गेली. काही ठिकाणी फळबागा पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या पावसाने माणिकदौंडी येथील कानेखा उमराव पठाण आणि पोपट घनशाम पाखरे यांच्या घरांची पडझड झाली, तर शहरातील वन विभागाजवळील आरगडे वस्तीवर गणेश आरगडे यांच्या घराची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले. मोहोज खुर्द येथील संपत ठोकळ यांच्या शेतीतील सोलर पॅनलचे नुकसान झाले.

शहरातील आनंदनगर येथील सोमनाथ सानप यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. तसेच काही गावांमध्ये शेतातील वीज उपकरणे आणि पाण्याच्या पंपांचेही नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या.

सामान्यतः जूननंतर मान्सून पाऊस सुरू होतो. परंतु यंदा मेमध्येच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या काळातही मुसळधार पावसाची शक्यता असून, तालुक्यातील पाण्याची पातळी लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, शेतकर्‍यांच्या नुकसानीमुळे प्रशासन, तसेच नगरपरिषदेसमोर पुनर्वसनाचे आव्हान उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT