विश्वास संपादन करून व्यापार्याकडे पोहोच करण्यासाठी दिलेला सुमारे सव्वा सहा लाख रुपयांची मालट्रक चालकाने परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मालट्रक चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र भीमसिंग पुनिया (रा. फत्तेहबाद, हरियाणा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत एमआयडीसी येथील दिल्ली हरियाणा रोडलाईन ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक नवीनकुमार अगीलाल चौधरी (मूळ रा. रामगड, राजस्थान, हल्ली रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते संपूर्ण देशभरात मालाची वाहतूक करत असतात. त्यांच्याकडे राजस्थानच्या जयपूर येथील राजधानी ट्रेडिंग कंपनी यांना 12 टन कांदा पोहोच करण्याचे काम मिळाले. त्यांच्या कार्यालयात मालट्रक चालक सुरेंद्र भीमसिंग पुनिया (रा. फत्तेहबाद, हरियाणा) हा मालट्रक घेऊन आला. कांदा जयपूर येथे पोहोच करतो म्हणाला. फिर्यादी व चालक पुनिया यांची ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या निमित्ताने ओळख असल्याने त्यांनी विश्वासाने पुनिया याच्याकडे 6 लाख 24 हजारांचा 12 टन कांदा जयपूरला पोहोच करण्यासाठी दिला. मात्र, त्याने कांदा जयपूर येथे पोहोच न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावून फिर्यादीच्या ट्रान्सपोर्ट कंपनीची आर्थिक फसवणूक केली.
दरम्यान, ट्रक चालक पुनिया याच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्याच्याशी संपर्क न झाल्याने व्यवस्थापक नवीनकुमार चौधरी यांनी सोमवारी (दि. 6) रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नेहूल हे करत आहेत.