विक्रमसिंह पाचपुते pudhari
अहिल्यानगर

आमदार विक्रमसिंह पाचपुतेंकडून सुसंस्कृत राजकारणाचा अध्याय

राहुल जगतापांना वाढदिवसाच्या शुभेच्छा चर्चेत!

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी. गव्हाणे

श्रीगोंदा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी निकालाच्या दुसर्‍याच दिवशी पराभूत उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांना वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमातून दिलेल्या शुभेच्छा तालुक्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

मतदारसंघात बहुरंगी निवडणूक झाली. भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांनी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांचा पराभव केला. निवडणुकीत जगताप-पाचपुतेंदरम्यान मोठी चुरस दिसून येत होती. दोन्ही नेत्यांकडे तरुणांची मोठी फौज होती. उभयतांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. दोघांचे कार्यकर्ते गावोगावी परस्परांच्या अंगावर धावून जात होते. अशा कडवट वातावरणात निवडणूक पार पडली. निकाल लागला. जगताप समर्थकांना तो अनपेक्षित होता. निकालाच्या दुसर्‍या दिवशी जगताप यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त विजयाची भेट देण्याचा कार्यकर्त्यांचा मनोदय होता. मात्र, जगताप समर्थकांच्या पदरी अपयश आले.

एवढे सारे घडल्यानंतर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नूतन आ. विक्रम पाचपुते यांनी जगताप यांचे वाढदिवसानिमित्त जाहीरपणे हार्दिक अभीष्टचिंतन केले. त्यांच्या या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जगताप समर्थक तर स्तंभित झाले. निवडणूक निकालाची कटुता दूर करून पाचपुते यांनी ज्या खिलाडूवृत्तीने प्रमुख राजकीय विरोधकाचे अभीष्टचिंतन केले त्याने तालुक्यात एक सकारात्मक अन् विधायक मेसेज पोचला अशी चर्चा ऐकायला मिळत आहे

आ. पाचपुते यांच्या या उमदेपणामुळे तालुक्यातील दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना एक प्रकारे बोध घेण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीतील कटुता अनेक महिने जोपासणार्‍यांसाठी हा एक धडा आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी दुष्मनी मोल घेणे अन् डोकेफोडी करणे तद्दन वेडेपणाचे आहे. कारण ज्यांच्यासाठी ही मंडळी दावे तोडतात, ते नेते वैयक्तिक संबंधाची जोपासना करतात. पाचपुते यांची वरील कृती ही साधारण वाटत असली, तरी त्यातून अनेकांना योग्य तो बोध मिळू शकतो.

लोकशाहीत विरोधक हा महत्त्वाचा घटक असतो. लोकशाही सुदृढ ठेवायची असेल तर विरोधकांचा आदर ठेवला पाहिजे, हे नूतन आ. पाचपुते यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. नवीन आमदारांची कार्यशैली कशी असेल, याची अनेकांना उत्सुकता होती. विरोधी उमेदवाराला निकालाच्या दुसर्‍या दिवशी शुभेच्छा देऊन आ. पाचपुते यांनी आपली कार्यपद्धती स्पष्ट केल्याचा हा दाखला आहे.

दरम्यान, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस सप्टेंबर महिन्यात झाला, त्यावेळी राहुल जगताप यांनीही त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. ही आठवण सांगत दोन्ही तरुण नेत्यांच्या सुसंस्कृतपणाचे गोडवे तालुक्यात गायले जात आहेत.

लोकशाही प्रक्रियेमध्ये स्पर्धा आणि जिंकणं हा स्थायीभाव असला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीत एक-दोन अपवाद वगळता निवडणुकीत उभा राहिलेल्या उमेदवारांनी आरोपांची चिखलफेक केली नाही. यातून श्रीगोंद्यात उभा राहिलेला तरुण उमेदवारांच्या स्वभावाचे दर्शन घडले. त्याचाच एक भाग म्हणजे निवडणुकीत विजयी झालेल्या आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी माजी आ. राहुल जगताप यांना सामाजिक माध्यमातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. या पुढील काळात नेत्यांनी अशीच वाटचाल चालू ठेवली, तर त्याचा भावी पिढीवर सकारात्मक परिणाम पडेल. एक सकारात्मक विचारधारा निर्माण होईल अन् लोकशाहीला हेच अपेक्षित आहे.
प्रा. डॉ. बाळासाहेब बळे, राजकीय विश्लेषक
राजकीय विरोधक हा दुश्मन नसतो, हा संस्कार मी माझ्या पाल्यांवर केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीतील विरोधकाला दुसर्‍या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा नूतन आमदारांनी देणे हा आमच्या घराण्यातील सुसंस्काराचा भाग आहे. दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः नित्यनेमाने त्यांना शुभेच्छा देत होतो. मतभेद असले तरी मनभेद असू नये, विरोधक हा शत्रू नसतो, हीच शिकवण मी मुलांना दिलेली आहे.
बबनराव पाचपुते, माजी मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT