अहिल्यानगर नगरपालिका  pudhari
अहिल्यानगर

एकटे डॉ. बोरगे जबाबदार कसे? सक्तीच्या रजेच्या कारवाईबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा

केवळ महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावरच कारवाई

पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महापालिका स्तरावर महत्त्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जाते. अहिल्यानगर महापालिकेला 24 रँकिंग मिळाल्यानंतर आरोग्य अधिकार्‍यांनी सर्वच आरोग्य केंद्रप्रमुखांना नोटिसा बजावून खुलासा मागविला होता, असे असताना आयुक्तांनी केवळ महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावरच कारवाई करीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. याबद्दल पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.

जिल्हा परिषदा, महापालिकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जाते. आता हे रँकिंग म्हणजे कोणतीही स्पर्धा नाही. अधिकारी व कर्मचार्‍यांना वस्तुस्थिती समजावी आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य निर्देशांकानुसार अहिल्यानगर महापालिकेला 24 रॅकिंग मिळाल्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी विभागप्रमुख म्हणून ऑगस्ट 2024 मध्येच मनपातील 17 केंद्रांवरील वैद्यकीय अधिकार्‍यांना नोटिसा बजावून आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते.

शासनाच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील विविध भागात 18 आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये महिला आरोग्य, फॅमिली प्लॅनिंग, लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा सक्षम रीतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांवर असताना त्यांनी कामात कसूर केल्याने डॉ. बोरगे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यात डॉ. बोरगे यांनी तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश राजूरकर यांनाही नोटीस बजावून आरोग्य कार्यक्रमाचे काम असमाधानकारक असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. या नोटिशीची एक प्रत आयुक्तांनाही देण्यात आली होती. असे असताना आता रँकिंगच्याच कारणावरून आयुक्तांनी डॉ. बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आणि ज्यांना कामात सुधारणा करण्याची नोटीस बजावले त्या डॉ. सतीश राजूरकर यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून पदभार दिला आहे.

आरोग्य सेवा रँकिंग ही केवळ शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेली प्रणाली आहे. यात कुठेही रँकिंग घसरली म्हणून अधिकार्‍यांवर शिस्तभंग कारवाई अथवा सक्तीच्या रजेवर पाठवणे असे नमूद केलेले नाही, असे असताना आयुक्तांनी डॉ. बोरगे यांच्यावर केलेल्या कारवाईने उलटसुलट चर्चा आहे.

आरोग्य अधिकारी कसा नसावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. अनिल बोरगे आहेत. शासन चुकीचे आहे, आयुक्त चुकीचे असे ते म्हणतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रँकिंगमध्ये अहिल्यानगर महापालिका 26 व्या स्थानावर आहे. डॉ. बोरगे यांच्यासारखा आरोग्य अधिकारी म्हणजे शहराचे दुर्दैव आहे.
यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT