नगर: माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीतील अर्ज माघारीच्या काल शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान दोन्ही गटाकडून इच्छुक जास्त असल्याने काल 198 इच्छुकांनी अर्ज माघार घेतली, मात्र यावेळी मोठे नाराजी नाट्य पहायला मिळाले.
यातून सत्ताधारी गटाचे दोन विद्यमान संचालकही विरोधी गटात दाखल झाल्याचे समजले. एकूणच या निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यात विरोधक यशस्वी झाल्याचे दिसले, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे अधोरेखित झाले आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्ताधारी पुरोगामी सहकारी मंडळ विरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळ अशी सरळ लढत होणार आहे. काल मंगळवारी अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. त्यामुळे 21 जागांसाठी 242 इच्छुक असताना नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार याकडे 9 हजार सभासदांचे लक्ष लागले होते. काल अकरा वाजेपासून सहकार विभागाच्या कार्यालयात माघारीसाठी गर्दी होताना दिसली. अनेकांनी आपल्या मंडळाच्या लोकांवर तोंडसुख घेताना आपली नाराजी व्यक्त केली.
तसेच आपण सुचवलेल्या उमेदवाराऐवजी दुसर्यालाच उमेदवारी दिल्याने काहींनी ‘आता पाहून घेऊ’ असा इशाराच खासगीत बोलताना दिला. त्यामुळे या निवडणुकीत ‘पॅनलमधे सोडासोडी, अन् आपलेच उमेदवार पाडापाडी’ होणार हे लपून राहिलेले नाही. अर्ज माघारी घेताना इच्छुकांच्या चेहर्यावरील हावभाव असेच काही सांगून जाताना दिसले.
जुने चौघे, नवीन 38 चेहरे रिंगणात
सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळांने आपल्या 17 संचालकांपैकी एकच धनंजय मस्के यांना पुन्हा संधी दिली. तर उर्वरित 20 नवे चेहरे दिले आहेत. परिवर्तन मंडळाने आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडके, महेंद्र हिंगे या तिघांना पुन्हा संधी दिली, तर 18 नवीन उमेदवार दिले आहेत.
उमेदवार: सर्वसाधारण मतदारसंघ: म्हस्के धनजंय, वेताळ शिवनाथ, थिटे कल्याण, काळदाते आशिष, शिंदे राजेश, काकडे वाल्मीक, फटांगरे सचिन, बोरुडे राहुल, कानवडे भास्कर, काळे अशोक, म्हसे गणेश, चेमटे संजय, दाते बाबासाहेब, काळे सोपान, गायकवाड बाळाजी, फुंदे छबु, पठारे विजय, गाडे संभाजी, गुंजाळ उमेश, अनभुले बाजीराव, धुमाळ किशोर, रक्टे साहेबराव, कानबटे सुधीर, कोताडे अतूल, आभाळे केरु, आळेकर अशोक, जगताप आप्पासाहेब, शिदे आप्पासाहेव , कोतकर राजेंद्र, दानवे सुनिल, दिवटे अजितराय. अनुसूचित जाती, जमाती : महेंद्र राजगुरू, विजयकुमार बांदार, सुरज घातविसावी. महिला प्रतिनिधी : माधुरी एकशिंगे, वर्षा खिलारी, सुरेखा ढोकळे, वैशाली दारकुंदे. इतर मागासवर्गीय : संजय वाळे, अर्जुन वाळके. भटक्या विमुक्त जाती : वैभव सांगळे, बाबासाहेब बोडके.