मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने मुळा धरणाच्या डाव्या कालव्याला व भागडा चारीला 26 डिसेंबर रोजी तर निळवंडे धरणाच्या कालव्यातून 30 डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.
याबाबत बोलताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून तसेच वांबोरी चारीला नुकतेच पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर डावा कालवा व निळवंडे धरण कालव्याच्या लाभ क्षेत्रातील, तसेच भागडा पाईपचारीच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी व कार्यकर्त्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना सूचना व आदेश केले असून जोगेश्वरी आखाडा येथील दुरुस्तीचे काम पूर्ण करून 26 तारखेला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.
त्याच वेळी भागडा पाईप चारीला देखील पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच किरकोळ दुरुस्तीचे काम पूर्ण करून निळवंडे धरणाच्या कालव्यातून 30 डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून मुळा धरण लाभधारक क्षेत्रात पाण्याचे आवर्तन योग्य वेळी व योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकर्यांना न्याय देण्यासाठी तत्पर आहोत, असेही आ. कर्डिले यांनी यावेळी सांगितले.