Maratha reservation protest
नगर: मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणारच आहे. ही लढाई आरपारची आहे. ती जिंकायची आहे. जोरात ताकद लावली तर शंभर टक्के जिंकणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन मराठा आरक्षणाचे संयोजक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.
29 ऑगस्टच्या मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी मनोज जरांगे यांच्या राज्यभर चावडी बैठका सुरु आहेत. बुरुडगावला चावडी बैठक घ्यावी याचे निमंत्रण देण्यासाठी माजी उपसरपंच खंडू काळे आणि त्यांचे सहकारी आंतरवली येथे गेले होते. त्यानुसार जरांगे पाटील गुरुवारी सायंकाळी बुरुडगावला आले होते. अचानक आल्यामुळे संयोजकांची तारांबळ उडाली. या चावडी बैठकीला दीड हजारांवर मराठा बांधव उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईत आरक्षणासाठी आंदोलन करणार आहोत. शासनाची परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन होणारच आहे. ही आरपारची लढाई आहे. ती जिंकायची आहे. त्यासाठी सर्वानी ताकद लावणे गरचेचे आहे. ऑगस्ट महिन्यात सणसुदीचे दिवस अधिक आहेत.
सण दरवर्षी येतात. सणाच्या नादात आंदोलनाकडे दुर्लक्ष करु नका. सण साजरे करीत बसला तर शिक्षण आणि नोकरी हातातून कायमची जाईल. ती पुन्हा येणार नाही. त्यामुळे मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन काळात अफवा पसरविल्या जातील. या अफवाकडे दुर्लक्ष करा असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी बुरुडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कुलट, माजी उपसरपंच खंडू काळे, जालिंदर वाघ, गणेश दरंदले, सोमनाथ तांबे, महेश निमसे, राधाकिसन कुलट, रवींद्र ढमढेरे, बाळासाहेब जाधव आदींसह मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.