पाणी (Water) Pudhari
अहिल्यानगर

Contaminated Water : धक्कादायक! अहिल्यानगर जिल्ह्यातील 27 गावे पितात दूषित पाणी

contaminated water : 27 गावांचे 38 पाणी नमुने पिण्यास अयोग्य आले, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

contaminated water in 27 village in ahilyanagar

नगर : अकोले तालुक्यात काविळेच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा विषय चर्चेत आला असतानाच, जिल्हा परिषदेच्या एका अहवालानुसार जिल्ह्यातील 27 गावांतील 38 पाण्याचे स्त्रोत हे दुषित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रशासनाला उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

वरिष्ठ भुवैज्ञानिक अधिकारी, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, तसेच कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा यांच्याकडे एप्रिल महिन्यात ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी पाण्याचे नमुने पाठविले होते. यामध्ये दुषित पाणीसाठ्यांची माहिती पुढे आली आहे.

15 गावांच्या पाण्यात क्लोरिन कमीच

ग्रामिण पातळीवर दैनंदिन पाणी जलशुद्धीकरण व टि.सी.एल साठवण याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवरुन व ग्रामपंचायत स्तरावरून सनियंत्रण केले जाते. परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहतात. त्याचा परिणाम दुषित पाणी असलेल्या गावांची संख्या वाढत आहे. एप्रिल 2025 च्या अहवालात जिल्ह्यातील 15 गावांचे ब्लिचिंग पावडर नमुने 20 टक्के पेक्षा कमी क्लोरिन उपलब्धता असल्याचे आढळुन आले. तसेच 27 गावांचे 38 पाणी नमुने पिण्यास अयोग्य आले आहेत.

आरोग्य विभागाच्या सूचना

पिण्याचे पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे शुद्धीकरण दैनंदीन ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांकडून होत आहे याची खातरजमा करावी, ग्रामपंचायतीमध्ये नियमित गुणवत्तापुर्वक पुरेसा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध ठेवावा, गावात स्वच्छता मोहीम राबवून सांडपाणी व कचर्‍याचे व्यवस्थापन करावे, पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता करावी तसेच पाईपलाईन व पाण्याचे व्हॉल गळती असणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक नळांना तोटया बसविण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत.

सर्वाधिक दूषित पाणी अकोल्यात

अकोले ः वीरगाव, गणोरे, पाचनई, अंबित, माणिक ओझर, बोरी, पाडाळणे, चिंचबन, पिंपळगाव खांड तसेच राजूरचे 11 जलस्त्रोत असे एकूण 20 ठिकाणे जलस्त्रोत दूषित आढळले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील आपेगावच्या एका जलस्त्रोताचे पाणी देखील अयोग्य आहे.

नगर तालुक्यात वडगाव तांदळी, हातवळण, भातोडी पारगाव, बुर्‍हानगर, नारायण डोह येथील पाणीसाठे दुषित आढळले आहेत.

पारनेर तालुक्यात कळस, कुरुंद, काळकूप, बाबुर्डीचे प्रत्येकी एकासह टाकळीढोकेश्वरचे दोन जलस्त्रोत दुषित निदर्शनास आले.

पाथर्डी तालुक्यात डांगेवाडीच्या एका जलस्त्रोताचे पाणी पिण्यास अयोग्य आहे.

संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द, रायतेवाडी, काकडवाडी, पारेगाव बुद्रुक येथील पाणी तपासणीत दुषित घटक आढळले आहेत.

तर शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील एका जलस्त्रोताचे पाणी दूषित असल्याचे तपासणीतून समोर आले.

पाणी तपासणी नेमके कोठे होती?

पाणी नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळा आहे. याशिवाय राहाता व कोपरगावसाठी राहत्यात. पाथर्डी व शेवगावसाठी पाथर्डीत, कर्जत आणि जामखेडसाठी कर्जतमध्ये. संगमनेर व अकोलेसाठी संगमनेरात. नगर, पारनेर, राहुरीसाठी नगर (केडगाव), श्रीरामपूर, नेवाशासाठी श्रीरामपुरात प्रयोगशाळा आहेत. यामध्ये पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. साधारणतः आठ दिवसांत हा अहवाल तयार केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT