नगर : महापालिकेचे 15 व्या वित्त आयोगाचे 16 लाख 50 हजार रुपये संगनमत करून वैयक्तिक खात्यावर वर्ग केल्याच्या आरोपावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे व शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे याना अटक करण्यात आले. ते पैसे विजयकुमार रणदिवे याने पाहुण्याच्या खात्यावर वर्ग केल्याचे चौकशी समोर आले असून, आता पोलिस त्या पाहुण्याचा शोध घेत आहेत. वरील दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांवर कामकाजातील निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यानंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आरोग्य विभागाची चौकशी केली. त्या अनेक बाबी घडकीस आल्या. तो चौकशी अहवाल आयुक्त डांगे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. आरोग्य विभागाचे महापालिकेचे स्टेट बँकेतील खाते हातळण्याचे अधिकारी मेकर म्हणून विजय रणदिवे याला होते. तर, चेकर म्हणून डॉ. अनिल बोरगे यांना होते. विजय रणदिवे याने 15 व्या वित्त आयोगाचा 15 लाखांचा निधी पीईएमएस प्रणालीद्वारे स्वतः च्या खात्यावर वर्ग केला. त्यानंतर पुन्हा 16 लाख 50 हजारांचा निधी वर्ग केला. ही बाब उघड झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय रणदिवे याने 15 लाख रुपये पुन्हा महापालिकेच्या स्टेंब बँकेतील खात्यात वर्ग केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले. दुसरीकडे उर्वरित 16 लाख 50 हजारांची रक्कम अद्यापि वर्ग केल्याचे दिसून येत नाही.
कोतवाली पोलिसांनी चौकशीकामी बोलवून दोघांना अटक केली. त्यात 16 लाख 50 हजाराबाबत त्यांना उत्तर देता आले नाही. सुरूवातील त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच ते बोलते झाले. विजय रणदिवे याने ती 16 लाख 50 हजारांची रक्कम दोन पाहुण्याच्या खात्यावर वर्ग केल्याचे सांगितले. आता कोतवाली पोलिस त्या पाहुण्यांच्या शोधात असून, त्यांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी डॉ. बोरगे व विजय रणदिवे यांना पोलिस कोठडीतून तपासाकामी पुन्हा पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.
डॉ. अनिल बोरगे व विजयकुमार रणदिवे यांना कोतवाली पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, आज सकाळी डॉ. अनिल बोरगे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना हॉस्पिटलला आणण्याच्या पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या.