नगर: कनार्टकहून गुजरातकडे सुपारी आणि तंबाखू घेऊन जाणार्या 13 ट्रॅक स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिंचोली शिवारातून ताब्यात घेतल्या. या कारवाईत 200 टन लाल सुपारीसह तब्बल साडेआठ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दरम्यान, वस्तू आणि कर सेवा (जीएसटी) विभागाकडून टॅक्ससह इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर येथे एसपी घार्गे यांनी पत्रकारांना कारवाईची माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी व टीम उपस्थित होती.
राहुरीतून वर्ग तीनच्या दर्जाची सुपारी आणि तंबाखूच्या ट्रक जाणार असल्याची खबर पोलिस निरीक्षक कबाडी यांना लागली होती. त्यांनी उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, भीमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सतीश भवर, सुनील मालवणकर, महादेव भांड, उमाकांत गावडे आदींचे पथक रवाना केले होते. चिंचोली शिवारात पथकाने सापळा लावून 13 ट्रक ताब्यात घेतल्या.
अबरार अल्लाउद्दीन खान, तोफीक हनिफ खान, अक्रम इसब खान, इर्शाद ताजमोहमंद मेहू, आसिफ पप्पू मेव, जमशेर अब्दुल खान (सर्व हरियाणा), तसेच अशोक पोपट पारे, रखमाजी लक्ष्मण मगर (कर्जत), कालिदास काकडे (सोलापूर), सचिन जिजाबा माने (केडगाव) यांच्यासह अन्य अशा 11 चालकांना ताब्यात घेतले. या चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्या जबाबात विसंगती आढळली. त्यामुळे पथकाला संशय बळावला.
ट्रकमध्ये लाल सुपारी आढळली. ही सुपारी आणि तंबाखू कर्नाटकमधून गुजरातमध्ये मावा बनविण्यासाठी नेली जात असल्याचे तपासातून समोर आले. यावेळी वाहतूक परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही बिल किंवा पावती मिळाली नाही. नगरच्या जीएसटी विभागाला ही माहिती दिली आहे, तसेच अन्न व औषध प्रशासनालाही कारवाई कळविण्यात आली आहे.
एकूण 6 कोटी 17 लाख रुपयांची 2,05,950 किलो (200 टन) सुपारी पकडली आहे. तसेच 15 लाख 60 हजार रुपये किमतीची 7800 किलो तंबाखू व 2 कोटी 10 लाख रुपये किंमतीचे 13 ट्रक असा एकूण 8 कोटी 43 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.