शिर्डी: जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाप्रमाणेच शिर्डीमध्ये भाजप पक्षाचे होत असलेले अधिवेशन ऐतिहासिक करुन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जिल्ह्यामध्ये शत-प्रतिशत भाजपाच्या विजयाचा निर्धार करण्याचा संकल्प करु या, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होत आहे. या अधिवेशनास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे. पी नड्डा, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर व भाजपला प्रथम क्रमांकाने मिळालेल्या जागा यासर्व पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये होत असलेले अधिवेशन अधिक उत्साहाने करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे अधिवेशनाची नियोजन आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी पक्षाचे महामंत्री आमदार विक्रांत पाटील, आमदार शिवाजीराव कर्डीले, महामंत्री विजय चौधरी, राजेश पांडे, रवी अनासपुरे, माधवी नाईक, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग उपस्थित होते.
राज्यस्तरीय अधिवेशनास पक्षाचे सुमारे वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या. या समित्यांकडे अधिवेशनातील विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी आमदार विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी, रवी अनासपुरे यांनी समित्यांच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करुन चांगले नियोजन करण्याचे आवाहन केले. निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणनिती या अधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
मंत्री विखे पाटील यांनी, पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी या अधिवेशनाचे यजमानपद शिर्डीला दिल्याबद्दल आभार मानले. हे अधिवेशन न भूतो न भविष्यती अशा पध्दतीने यशस्वी करु, असे सांगत, विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने जसा विजय मिळविला तसेच हे अधिवेशनसुध्दा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते करतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.