नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता करवसुलीसाठी नाशिक महापालिकेने १ एप्रिलपासून करदात्यांसाठी सुरू केलेल्या सवलत योजनेचा पालिकेला चांगलाच धनलाभ झाला आहे. मागील तीन महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत तब्बल ८८ कोटी ५२ लाख जमा झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १७ कोटी अधिक जमा झाले आहेत. गतवर्षी या तीन महिन्यांत ७१ कोटींची वसुली झाली होती. या योजनेचा तब्बल दोन लाखांहून अधिक करदात्यांनी लाभ घेत सवलत पदरात पाडून घेतली आहे.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल, तर करवसुलीचे प्रमाण वाढवा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीसाठी २२५ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे, तर पाणीपट्टीसाठी 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. गतवर्षी उद्दिष्ट पूर्ण करताना घाम गाळावा लागला होता. हा अनुभव लक्षात घेता करसंकलन विभागाने करसवलत योजनेची प्रभावी जनजागृती केली. एप्रिल ते जून अशी तीन महिने नियमित करदात्यांसाठी विशेष सवलत योजना राबवते. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास आठ टक्के सूट दिली जाते. या महिन्यात तब्बल रेकाॅर्डब्रेक ५२ कोटींची वसुली झाली. मे महिन्यात पाच टक्के सवलत देण्यात आली. या महिन्यात २३ कोटींचा करभरणा नागरिकांनी केला, तर शेवटच्या चालू जून महिन्यात तीन टक्के कर सवलतीचा लाभ घेत दोन कोटी ३२ लाखांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. एकूणच, करसवलत योजना मनपाला जोरदार पावली आहे. गतवर्षीच्या तुलना करता जादाचा भरणा मनपा तिजोरीत झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, ८८ कोटींची वसुली झाली असली, तरी दिलेल्या उद्दिष्टापैकी एकूण ११२ कोटी वसुली करण्यासाठी मनपा करसंकलन विभागाला जोरदार प्रयत्न करावे लागेल.
१ जुलैपासून दंड
जून अखेरपर्यंत म्हणजे आज तीन टक्के कर सवलत योजनेचा अंतिम दिवस असून, करदात्यांना सूट मिळविण्याचा अखेरचा दिवस आहे. मात्र, त्यानंतर म्हणजे जुलैपासून मालमत्ता कर देयकावर दोन टक्के दंड लागू होणार आहे.
करसवलत योजना
विभाग – वसुली
सातपूर – ९ कोटी ९५ लाख
ना. पश्चिम – १७ कोटी ३१ लाख
ना. पूर्व – १५ कोटी ५५ लाख
पंचवटी – १४ कोटी ५९ लाख
न. नाशिक – १७ कोटी ९१ लाख
नाशिकरोड – १३ कोटी ३० लाख